छत्रपती संभाजीनगर : संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजप महायुतीचे उमेदवार अतुल सावे विजयी झाले आहेत. औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात सुरुवातीच्या मतमोजणीच्या वेळी एमआयएमचे उमेदवार व माजी खासदार इम्तियाज जलील हे आघाडीवर होते, मात्र दुसऱ्या सत्राच्या मतमोजणीत जलील पिछाडीवर आले व अतुल सावे यांनी बाजी मारली आहे. संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिंदेंच्या संजय शिरसाट यांनी राजू शिंदे (शिवसेना- यूबीटी) यांचा पराभव केला. तर संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघात शिंदेंच्याच प्रदीप जैस्वाल यांनी बाळासाहेब थोरात (शिवसेना- यूबीटी) यांना चितपट केले. फुलंब्री मतदारसंघात भाजपच्या अनुराधा चव्हाण काँग्रेसच्या विलास औताडेंवर वरचढ ठरल्या. तर सिल्लोड विधानसभा मतदारसंघात अब्दुल सत्तारांनी आपला गड राखत ठाकरेंच्या सुरेश बनकरांचा पराभव केला. गंगापूर मतदारसंघात भाजपचे प्रशांत बंब यांनी शरद पवारांच्या सतीश चव्हाण यांना हरविले. तर वैजापूरात शिंदेचे रमेश बोरनारेंनी ठाकरेंच्या दिनेश परदेशीना आस्मान दाखवले. पैठण विधानसभा मतदारसंघात शिंदेंच्या विलास भुमरेंनी ठाकरेंच्या दत्ता गोर्डेंचा तर कन्नडमध्ये शिंदेंच्याच संजना जाधव यांनी पती हर्षवर्धन जाधव यांचा पराभव करत विधानसभेचे तिकीट काढले आहे.