– अशोक सुतार कामाच्या ठिकाणी अति ताणामुळे कर्मचार्यांवर परिणाम होतो. त्यामुळे शारीरिक आजार आणि मानसिक नैराश्याचे अनेक जण बळी ठरतात, असे अनेक अहवाल सांगतात. सध्याचे जग धावपळीचे झाले आहे. भरपूर पैसे कमावण्याच्या नादात किंवा कमी कालावधीत जास्त काम केल्यामुळे अनेक कंपन्यांमधील कर्मचारी विमनस्क अवस्थेत जगत असतात. जगभरात अनेक कंपन्यांमध्ये यंत्रवत काम सुरू असते. त्यामुळे जीवनशैली बदलली आहे. संगणकावर 16 ते 18 तास काम करीत असल्यामुळे स्वास्थाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण याचा प्रतिकूल परिणाम शरीर व मनावर होतो. या स्थितीमुळे व कामाच्या अति ताणामुळे जगभरात अनेकांचे बळी जातात. असाच एक प्रकार पुण्यातील अर्न्स्ट अँड यंग (ईवाय) या बहुराष्ट्रीय कंपनीत घडला आहे. या कंपनीत काम करणार्या तरुण सनदी लेखापाल (सीए) तरुणीचा कामाच्या अति ताणामुळे मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे तरुणीच्या अंत्यसंस्काराला तिच्या कार्यालयातील एकही कर्मचारी हजर नव्हता. याचे कारण म्हणजे कर्मचार्यांमध्ये नोकरी जाईल ही भीती होती किंवा अंत्यसंस्काराला कोणी जायचे नाही, अशी कंपनीची ताकीद असावी, असे वाटते. यावरून तरुणीच्या आईने संताप व्यक्त केला होता. यावर कंपनीचे अध्यक्ष राजीव मेमानी यांनी लिंक्डइनवरून एक पोस्ट करत मृत पावलेल्या तरुणीच्या कुटुंबाची माफी मागितली आहे. रोजगार टिकवून ठेवण्यासाठी कर्मचारी कंपनी व्यवस्थापनाच्या हाताचे बाहुले कसे बनले आहेत, हे या प्रकारातून दिसून येते. कामाच्या अति ताणामुळे मृत्यू झाल्याचा दावा मृत तरुणीच्या आईने केल्यानंतर केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने देशभरात असुरक्षित आणि शोषणयुक्त कामाच्या वातावरणाची चौकशी करण्याचे संकेत दिले आहेत. अति ताणामुळे एखाद्या कर्मचार्याचा जीव जावा ही दुर्दैवी घटना आहे. याप्रकरणी केंद्रीय कामगार मंत्रालयाने चौकशी सुरू केली आहे, तर येरवडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. माजी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी समाज माध्यमावर एक पोस्ट करत या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. तसेच चंद्रशेखर यांनी याप्रकरणी केंद्रीय कामगार मंत्रालयाला चौकशी करण्याचे आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत केंद्रीय कामगार राज्यमंत्री करंदलाजे यांनी चौकशी करण्याचे जाहीर केले. याप्रकरणी न्याय मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. चौकशी होईल, परंतु याप्रकरणी जबाबदार कुणाला धरणार? पूर्वीच्या कामगार कायद्यांची धार कंत्राटी पद्धतीच्या नव्या कायद्याने बोथट झाली आहे.26 वर्षीय सनदी लेखापाल तरुणी अॅना सॅबेस्टियन पेरायिलचा मृत्यू झाल्यानंतर आता अनेकजण कामाच्या ठिकाणी असणार्या तणावाबाबत बोलू लागले आहेत, तर अनेकांनी कामाच्या ठिकाणी असणार्या तणावाबाबत आपापली मते व्यक्त केली आहेत. भारत पे कंपनीचे सहसंस्थापक आणि शार्क टँक या कार्यक्रमामुळे लोकप्रिय झालेले अशनीर ग्रोवर यांनीही या कंपनीतील त्यांचा कटू अनुभव कथन केला आहे. अशनीर ग्रोवर यांचा एक जुना व्हिडिओ पुन्हा व्हायरल होत आहे. प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. ग्रोवर यांनी याच कंपनीतील कामाचा अनुभव कथन करताना एका मुलाखतीत म्हटले आहे की, ‘पहिल्या दिवशी जेव्हा कार्यालयात गेलो, त्यानंतर जे दिसले, ते पाहून धक्का बसला. मग मी छातीत दुखायला लागले असे सांगितले आणि तिथून पळ काढला. तिथे अक्षरशः मरणासन्न अवस्थेत आलेले कर्मचारी पाहून मला वाईट वाटले. असे वाटत होते की, तिथे मृतदेह पडले आहेत आणि त्यांचे फक्त अंत्यसंस्कार करायचे बाकी राहिलेत.’ ग्रोवर यांनी बड्या कंपन्यांत सुरू असलेले भयाण वास्तव चित्रणच रेखाटले आहे. अशनीर ग्रोवर यांनी म्हटले होते की, मला एक कोटी पगार आणि भागीदारी मिळाली होती. परंतु तिथे काम करण्याची त्यांना इच्छा नव्हती. ग्रोवर यांनी बोलण्याच्या ओघात टॉक्सिक कल्चरचा मुद्दा मांडला आहे. परंतु यावर लोकांच्या उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. काहीजण या वातावरणाला टॉक्सिक कल्चर म्हणतात. पण काम तर तिथेच होते, बाकी नॉन टॉक्सिक कल्चरचे खूप कार्यालय बघायला मिळतात. टॉक्सिक कल्चर याचा अर्थ मराठी भाषेत विषारी संस्कृती असा होतो. म्हणजे कामाच्या ठिकाणी वाद, भांडणे आणि स्पर्धा निर्माण करायची. तेथील वातावरण कृत्रिमरीत्या क्रियाशील करायचे आणि कर्मचार्यांकडून जास्तीत जास्त काम कमी वेळेत करून घ्यायचे. हीच पद्धत जगभरातील अनेक बड्या कंपन्यांत सुरू झाली आहे; परंतु अशी विषारी संस्कृती रूढ करून भौतिकदृष्ट्या कंपनीचा फायदा होत असला तरी कर्मचार्यांच्या आयुष्याशी कंपनी व्यवस्थापन खेळत असते हे निषेधार्ह आहे. मानवीय मूल्यांच्या वा नैतिक मूल्यांच्या दृष्टीने ते योग्य नाही. सोशल मीडियावर अॅनाच्या मृत्यूची ही बाब पसरल्यानंतर कंपनीवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी कंपनी व्यवस्थापना विरोधात कोणतीही कायदेशीर पावले उचलली जाणार नसल्याचे अॅनाच्या वडिलांनी स्पष्ट केले आहे. मात्र, याप्रकरणी योग्य ती चौकशी केली जाईल, असे आश्वासन केंद्रीय कामगार व रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी दिले आहे. अॅना या वर्षी फेब्रुवारीमध्ये सीए परीक्षा पास झाली होती आणि मार्चमध्ये या कंपनीमध्ये रुजू झाली होती. तिला कामाचा प्रचंड ताण होता, असा तिच्या वडिलांनी आरोप केला आहे. तिच्या कामाच्या वेळापत्रकामुळे तिला क्वचितच झोप मिळत असे. तिला योग्य आहारही घेता येत नव्हता. अॅनाच्या आईने ईवाय कंपनीच्या चेअरमनला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आमची मुलगी गेली तरी असा प्रकार इतर कोणत्याही व्यक्तीसोबत होऊ नये. कंपन्यांच्या बदलत्या कामाच्या पद्धतीमुळे, कर्मचार्यांना अति ताण येतो, हे नाकारता येत नाही. साहजिकच अति ताणाच्या कामामुळे बळी पडणार्या कर्मचार्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता भविष्यात नाकारता येत नाही, हेच गंभीर वास्तव आहे. मोठमोठ्या कंपन्यांतील असुरक्षित व तणावाखाली असलेल्या कर्मचार्यांसाठी उपाययोजना गरजेची आहे.