पीकविमा योजनेबाबत वेधले लक्ष; राज्य सरकारकडे शेतकऱ्यांच्या नजरा

कर्जत – यंदा राज्यात सर्वदूर अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांचा खर्चदेखील निघणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात पीकविमा योजनेत दावे निकाली काढताना विमा कंपन्यांकडून मोठी दिरंगाई होत आहे. त्यामुळे याचा शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हीच गोष्ट ओळखून आ. रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच भेट घेतली.
दरम्यान, राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्याने विमा कंपन्यांनी नफेखोरी न करता लवकरात लवकर शेतकऱ्यांना दिलेल्या मुदतीत नुकसानभरपाई देण्याची गरज आहे. परंतु सर्वेक्षण पूर्ण झाले असूनही विमा कंपन्या दावे निकाली काढायला उशीर लावत असून, नफेखोरीसाठी अनेक शेतकऱ्यांचे दावेदेखील फेटाळले जात आहेत. अशातच पीकविमा कंपन्यांकडून अनेक तांत्रिक कारणेदेखील सांगितली जात आहेत.
जिल्ह्यात पीकविमा कंपनीकडे शेतकऱ्यांनी भरलेला हप्ता व सरकारने भरलेला वाटा असे एकूण सुमारे 81 कोटी रुपये जमा केले असताना देखील विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना आतापर्यंत केवळ 9 कोटींची भरपाई देण्यात आली आहे.
याबाबत आ. पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सरकारने याकडे तातडीने लक्ष देऊन पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत राज्यातील 96.61 लाख शेतकऱ्यांनी 57.63 लाख हेक्टर शेतजमिनीसाठी विमा संरक्षण घेतले आहे.
यातील नुकसानग्रस्त पात्र शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळण्यासाठी आ. पवार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी घेतलेल्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक चर्चादेखील झाली आहे. यातून सरकार आता नेमका काय निर्णय घेणार आणि यावर कसा तोडगा काढणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.





