– अशोक सुतार राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पण ही अस्वस्थता आहे की अफवा, याबाबत काही मुद्दे विचारात घेणे गरजेचे आहे. राज्यात शिंदे व फडणवीसांचे सरकार आहे. परंतु केंद्रात शिवसेना-शिंदे गटाला सत्तेतील पुरेसा वाटा मिळालेला नाही. त्यामुळे मंत्रिपदासाठी आतुर असलेल्या शिंदे गटातील खासदार अस्वस्थ आहेत, अशी चर्चा आहे. सत्ताधारी पक्षांत अस्वस्थता आहे की नाही, याबद्दल साशंकता आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले एका पत्रकार परिषदेत म्हणाले की, महाविकास आघाडीत अस्वस्थता आहे, अशा सर्रास बातम्या येत आहेत. नाना पटोले यांनी असे म्हटल्यानंतर आता शिंदे व भाजपाच्या सरकारमधील खासदार नाराज आहेत, अशी बातमी प्रसारित झाली. हल्ली कधी, कुठली अफवा पसरेल याची खात्री देता येत नाही. गजानन कीर्तिकर यांची शिवसेना-शिंदे गटाचे संसदीय गटनेतेपदी निवड झाली आहे. पण रालोआतील (एनडीए) घटकपक्षांप्रमाणे मोदी सरकारच्या मंत्र्यांकडून त्यांना सन्मान दिला जात नाही किंवा कामे होत नाहीत. त्यामुळे कीर्तिकर यांनी उघडपणे भाजपच्या वागणुकीबद्दल आपली नाराजी व्यक्त केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर कीर्तिकर व अन्य नेत्यांनी परखडपणे आपली मते मांडली आहेत. सत्तेत असूनही त्याच्या लाभापासून अनेक नेते वंचित असतानाच आणि भाजपकडून सापत्न वागणूक मिळत असल्याच्या संशयाने गेल्या काही महिन्यांपासून शिंदे गटात अस्वस्थतेची भर पडू लागली आहे. शिवसेना-शिंदे गटातील आमदार-खासदार हे लोकसभा-विधानसभा जागावाटप, मंत्रिमंडळ विस्तार, सत्तेत असूनही कामे होत नसल्याने उघडपणे भूमिका मांडून नाराजी व्यक्त करीत आहेत. परंतु शिंदे गटाने आता लोकसभा 2024ची जोरदार तयारी करायला पाहिजे. भाजपा ज्याप्रमाणे कोणत्याही निवडणुकीची तयारी अगोदरच करतो, त्याप्रमाणे शिंदे गटाने आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी करणे आवश्यक आहे. जेव्हा पक्षात अस्वस्थता आहे अशी अफवा पसरली जाते, त्यावेळी ती अफवा गांभीर्याने घेऊन पुढील राजकीय रणनीतीकडे आपला मोर्चा वळवणे महत्त्वाचे ठरते. शिंदे गट जेव्हा सत्तेवर आला, तो एक जुन्या पक्षाविरोधात संताप व्यक्त करत आला आहे. त्यानंतर न्यायालयीन लढाई, विरोधकांचे आरोप पाहता शिंदे गटाने ठामपणे येणाऱ्या सर्व संकटांना तोंड देत आगामी निवडणुकीची तयारी करणे गरजेचे ठरते. ती आजची राजकीय गरज आहे. अन्यथा अफवा, वाद-प्रतिवाद यात अडकले जाऊन आगामी निवडणुकीत धक्का बसण्याची शक्यता आहे. लोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी भाजप व शिंदे गटात जागावाटप झालेले नाही. परंतु भाजपने सर्वच मतदारसंघांत लोकसभा-विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपने शिवसेनेला 2019 मध्ये दिलेल्या जागांप्रमाणे आता लोकसभेसाठी 22 आणि विधानसभेसाठी 124 जागा दिल्या जाणार नाहीत, हे शिंदे गटाला माहीत असावे. त्यामुळे शिवसेनेला आधीच्या निवडणुकीत दिल्या गेलेल्या सर्व जागा शिंदे गटाला मिळाव्यात, अशी मागणी कीर्तिकर व अन्य नेते करू लागले आहेत. मंत्रिमंडळ विस्तारही रखडला असून सध्या भाजप-शिंदे गटातील प्रत्येकी नऊ नेत्यांना स्थान मिळाले आहे. शिंदे गट व अपक्ष मिळून 50 आमदार सत्तेत सहभागी असताना मंत्रिपदे व महामंडळांपासून वंचित आहेत. सत्तेचे लाभ अन्य नेत्यांना मिळत नसल्याने नाराजी वाढत आहे. त्याचवेळी भाजपमध्येही मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने नाराजी आहे, पण ती उघडपणे व्यक्त करण्यात आलेली नाही. नाराजी व्यक्त करणे म्हणजे आपली पत कमी करणे असे भाजपा नेत्यांमध्ये आलेला अनुभवातील शहाणपणा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना त्यागाचे आवाहन करीत मंत्रिपद मागू नये, असे नुकतेच स्पष्ट केले आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार होणार की नाही आणि झाला, तर भाजप नेत्यांना फारसे स्थान मिळणार नाही, हे भाजपा नेते जाणतात. ज्यांना पदे मिळाली आहेत, त्यांनी त्याग करणे आवश्यक असताना, ज्यांना पदे मिळाली नाहीत त्यांनाच त्यागाचे आवाहन फडणवीस यांनी कशासाठी केले, अशीही चर्चा सुरू आहे. सत्तेत असूनही मंत्रिपदे, महामंडळे आदींचे लाभ मिळत नसल्याने उभयपक्षी नाराज असतील तर शिंदे गटात खदखद असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण ही अफवा असेल तर शिंदे गटाने कार्यरत राहणे आवश्यक वाटते. राजकारणात नेहमी दक्ष राहणे आवश्यक आहे. तरच पक्षातील जागा वाढू शकतात. शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असे ठामपणे सांगून रायगडच्या पालकमंत्रिपदावरही दावा सांगितला आहे. बच्चू कडू यांनी मंत्रिपदाची मागणी केली आहे. शिंदे यांनी कीर्तिकर, गोगावले, कडू या नेत्यांच्या वक्तव्यावर किंवा कोणत्याही मुद्द्यावर भूमिका मांडण्याचे टाळले आहे. शिंदे गटात दुसरीही धाकधूक आहे, ती म्हणजे न्यायालयाच्या मार्गदर्शनानुसार विधानसभेचे सभापती नक्की कोणता निर्णय देणार? ते 16 आमदार अपात्र तर होणार नाहीत, अशी शंका काही आमदारांना येत आहे. तशी शंका येणे साहजिकच आहे. परंतु अस्वस्थता ही स्वत:च लादलेली व्याधी असते, त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आगामी राजकीय नीती चोखाळणे गरजेचे असते. संयम खूप महत्त्वाचा असतो. संयम नसेल तर राजकारणात भले भले गारद होतात. एका बाजूला राज्यातील सत्ताधारी पक्षांमध्ये ही अवस्था असताना महाविकास आघाडीत तर सावळा गोंधळ सुरू असल्याचे दिसते. लोकसभा आणि विधानसभेच्या जागावाटपाबद्दल महाविकास आघाडीत कोणतीही चर्चा आणि फॉर्म्युला तयार झालेला नाही. शिवसेना-ठाकरे गटाला जागावाटपात कमी जागा मिळतील. शिवसेना-ठाकरे गटाच्या पक्षाच्या मुखपत्रातील अग्रलेखात, शिंदे गटात 22 आमदार आणि नऊ खासदार अस्वस्थ आहेत, असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाविषयी सूचक वक्तव्य केले आहे. 19 जून रोजी ठाकरे गट वेगळा वर्धापन दिन साजरा करणार आहे, तर शिंदे गटाने वेगळी तयारी केली आहे. त्यावरून शिंदे गट आणि ठाकरे गटात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिंदे गटाने विरोधक तसेच भाजपापासून सावध राहणे गरजेचे आहे. कारण भाजपाच्या लेखी सहपक्षांबद्दल ममत्व असेलच, असे सांगता येत नाही. राजकारणात सातत्याने कार्यरत राहून वेळीच इतर पक्षांचे डावपेच शिवसेना-शिंदे गटाने ओळखून दक्ष रहावे, हेच उत्तम.