प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – मुखई (ता. शिरूर) येथे एक कुटुंब लग्नासाठी बाहेरगावी गेले असताना चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. या घरफोडीत तब्बल वीस तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने आणि ५० हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. मुखई येथील मंगल आरळेकर या कुटुंबियांसह १० डिसेंबर रोजी घराला कुलूप लावून लग्नासाठी बाहेरगावी गेल्या होत्या. ११ डिसेंबर रोजी आरळेकर घरी परतल्यानंतर त्यांना दरवाजाच्या गेटचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी घरात पाहणी केली असता किचनच्या खिडकीचे गजही तुटलेले दिसले. घरात प्रवेश करून पाहणी केली असता कपाट उघडे आणि सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले.आरळेकर यांनी कपाटाची तपासणी केली असता त्यातील तब्बल वीस तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, पन्नास हजार रुपये रोख रक्कम आणि भिंतीवरील टीव्ही संच चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप आणि किचनच्या खिडकीचे गज तोडून आत प्रवेश केल्याचे समोर आले आहे.याबाबत मंगल रामचंद्र आरळेकर (वय ६६, रा. मुखई, ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय मस्कर करत आहेत.