कोलकता : महाराष्ट्र आणि दिल्ली विधानसभा निवडणुकांत विजय मिळवण्यासाठी भाजपने बनावट मतदारांचा आधार घेतला. तसेच कारनामे पश्चिम बंगालमध्येही करण्याचे प्रयत्न होत आहेत. मतदार याद्यांमध्ये इतर राज्यांतील बनावट मतदार घुसवले जात आहेत. निवडणूक आयोगाच्या पाठिंब्याने ते घडत आहे, अशा आरोपांची सरबत्ती बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी गुरूवारी केली. बंगालमधील विधानसभा निवडणूक अवघ्या वर्षभरावर येऊन ठेपली आहे. त्या निवडणुकीतील तृणमूलच्या रणनीतीचा रूपरेषा ठरवण्यासाठी पक्षाची राज्य परिषद झाली. त्यामध्ये बोलताना ममतांनी भाजपवर टीकेची झोड उठवली. तसेच, निवडणूक आयोगावरही आगपाखड केली. महाराष्ट्र, दिल्लीतील मतदार याद्यांमध्ये गुजरात आणि हरियाणाचे बनावट मतदार समाविष्ट करण्यात आले. त्याचीच पुनरावृत्ती बंगालमध्ये करण्याच्या हालचाली सुरू आहेत. प्रामाणिक, न्याय्य पद्धतीने निवडणुका झाल्यास आपण जिंकू शकणार नाही याची पूर्ण जाणीव भाजपला आहे. बनावट मतदारांचे कारनामे महाराष्ट्र, दिल्लीतील राजकीय पक्षांच्या ध्यानात आले नाहीत. मात्र, आम्ही ते नेमकेपणाने हेरले. पुन्हा एकदा खेला होबे (खेळ सुरू) होणार आहे. आम्ही जोरदार प्रत्युत्तर देऊ. तृणमूलचे नेते आणि कार्यकर्त्यांनी मतदार याद्यांच्या पडताळणीचे कार्य हाती घ्यावे. निवडणुकीआधी तृणमूलच्या प्राधान्यक्रमावर ते कार्य असेल. ती प्रक्रिया उद्यापासूनच सुरू होईल. पुढील १० दिवसांत ती पूर्ण व्हायला हवी, असे त्या म्हणाल्या. एक मतदार यादी हाती घेऊन ममतांनी बनावट मतदारांचे पुरावे बंगालच्या सर्व जिल्ह्यांमधून मिळत असल्याचा दावा केला. ही यादी पहा. त्यामध्ये गुजरात, हरियाणातील रहिवाशांची नावे आहेत. मी पूर्वी निवडणूक आयोगाचा आदर करायचे. पण, आता आयोगामध्ये भाजपशी जवळीक असणाऱ्यांचा समावेश होत आहे. नवे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी याआधी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील सहकार विभागात कार्य केले आहे. आम्ही दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या कार्यालयाजवळही निदर्शने करू शकतो. मतदार याद्यांमध्ये दुरूस्ती न केल्यास आम्ही ते निश्चित करू, असा इशारा त्यांनी दिला.