पिंपरीत पिस्तुलाच्या धाकाने लुटण्याचा प्रयत्न फसला

पिंपरी : पिस्तुल आणि चाकूचा धाक दाखवून तीन चोरट्यांनी साडेतीन लाखांची रोकड आणि गळ्यातील सोन्याची चैन लुटण्याचा प्रयत्न फसला. ही घटना बुधवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

संदीप श्रीपती ढवले (वय 33, रा. मु.पो. हुंडारे वस्ती, पिंपरी बुद्रुक, ता. खेड, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर त्याचा साथीदार किरण जाधव आणि अन्य एकजण अंधाराचा फायदा घेत पळून गेले. विशाल घनश्‍याम सोमानी (वय 40, रा. कोकणे चौकाजवळ, रहाटणी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमानी यांचे चाकण येथे वाईन शॉप आहे. रात्री दुकान बंद करून जमा झालेले साडेतीन लाख रुपये घेऊन आठ कामगारांसह ते आपल्या घरी जाण्यास निघाले. यातील तीन आरोपी दोन दुचाकीवरून त्यांचा चाकणपासून पाठलाग करीत होते. ते पिंपरी येथील अशोक टॉकीजजवळ आले असता दुचाकीवरील चोरट्यांनी त्यांना अडविले. पिस्तुल आणि चाकूचा धाक दाखवून सोमानी यांच्या गळ्यातील सोनसाखळी ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र सोमानी व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी आरोपी ढवले याला पकडून ठेवले. यामुळे घाबरलेले इतर दोघेजण पळून गेले.घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपी ढवले याला चाकूसह ताब्यात घेतले. याबाबत अधिक तपास उपनिरीक्षक ज्ञानोबा निकम करीत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)