पुणे : गंगाधाम रस्त्यावरील जमीन बळकाविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी नगरसेवक बाळा ओसवाल यांच्यासह चौघांविरोधात कोंढवा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याबाबत एका महिलेने कोंढवा पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुमीत तेलंग, शहाजी रणदिवे, एक महिला तसेच शिवसेनेचे माजी नगरसेवक बाळा ओसवाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रिठे यांचे पती आणि दीर यांनी गंगाधाम रस्ता परिसरात जमीन खरेदी केली आहे. सुमीत तेलंगने संबंधित जागा त्याच्या वडिलांच्या मालकीची असल्याचे रिठे यांना सांगितले होते. त्यानंतर रिठे, त्यांची बहीण, आई हे जमिनीच्या पाहणीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी तेलंग, रणदिवे, बनसोडे यांनी मारहाण केल्याचे रिठे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, बाळा ओसवाल त्या ठिकाणी आले. “या जागेचा विषय संपवून टाका. मी 30 लाख रुपयांना जागा खरेदी केली आहे. मी तुम्हाला शेवटची ताकीद देतो. येथून निघून जा,’ अशी धमकी ओसवाल यांनी दिल्याचे रिठे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. सहायक पोलीस निरीक्षक सुरवसे तपास करत आहेत.