चिखलीत आणखीन एक एटीएम फोडण्याचा प्रयत्न

पिंपरी – तीन आठवड्यांपूर्वी चिखली परिसरातील दोन एटीएम चोरट्यांनी फोडली होती. गुरुवारी (दि.१२) पहाटे म्हेत्रे वस्ती, चिखली येथील आयसीआयसीआय बँकेचे एटीएम फोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार म्हेत्रे वस्ती चिखली येथे आयसीआयसीआय बँकेचे एटीएम सेंटर आहे. पहाटे दोन वाजताच सुमारास एक चोरटा पैसे काढण्याच्या निमित्ताने एटीएम सेंटरमध्ये येऊन पाहणी करून गेला. त्यानंतर पहाटे चार वाजताच्या सुमारास तीन चोरटे एटीएम सेंटरमध्ये आले. त्यांनी आतील सीसीटीव्ही कॅमेरा बाहेरील रोडच्या दिशेला फिरवला. त्यानंतर एटीएम सेंटरमधील दर्शनी भागाची तोडफोड केली. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. हे चोरटे स्थानिक असावेत, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

तीन आठवड्यांपूर्वी चिखली पोलिस ठाण्याच्या हद्दीत एटीएम फोडण्याचे दोन प्रकार उघडकीस आले. यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पोलीस ठाणे तसेच गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांना रात्रीच्या वेळी एटीएम सेंटरची पाहणी करण्यासाठी संयुक्त पथक नियुक्त केले. मात्र तरी देखील शहरात सहा एटीएम फोडण्याचे प्रकार घडले आहेत. यामुळे पोलिसांच्या गस्तीबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.