पर्यटनाच्या विकासासाठी सदाशिवगडाला गती देण्याच्या प्रयत्न

डॉ. अजित साजणे यांच्या पुढाकाराने कार्यवाही; लवकरच निसर्ग पर्यटन विकास आराखडा
कराड – शासनाच्या मदतीवर अवलंबून न राहता देशात प्रथमच लोकवर्गणीतून गडाखालून गडावर पाणी नेण्यात यशस्वी ठरलेल्या सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानने किल्ले सदाशिवगड विकासाला अधिक गती देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून कराडचे वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. अजित साजणे यांच्या मार्गदर्शनाखाली किल्ले सदाशिवगडच्या सर्व्हेक्षणास प्रारंभ करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच किल्ले सदाशिवगडचा निसर्ग पर्यटन आराखडा तयार होण्याची आशा पल्लवीत झाली आहे. अफजलखान वधानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले सदाशिवगड स्वराज्यात आणला होता. विजापूरहून येणारे शत्रू सैन्य कडेगाव प्रांतातून सदाशिवगड मार्गेच स्वराज्यावर चाल करून येत असे. अशा या ऐतिहासिक सदाशिवगडच्या संवर्धनासाठी गेल्या 12 वर्षापासून सदाशिवगड मावळा प्रतिष्ठान कार्यरत आहे.

गडावर पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानने महत्त्वकांक्षी सदाशिवगड पाणी योजनेचे काम हाती घेतले आहे. या योजनेचे काम अंतिम टप्प्यात पोहचले असून पहिली चाचणीही यशस्वी ठरली आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यात 18 मे रोजी कराडचे वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. अजित साजणे यांनी पुढाकार घेत वास्तू विशारद इंद्रजित नागेशकर यांना किल्ले सदाशिवगडची पाहणी करण्यासाठी पाचारण केले होते. त्यावेळी नागेशकर यांनी गडाचे सर्व्हेक्षण करून नकाशे तसेच अन्य माहिती उपलब्ध करून दिल्यास सदाशिवगड विकास आराखडा बनवणे अधिक सोपे होईल, अशी सूचना केली होती.

या सूचनेनुसार गडावरील चिंच विहिरीसह दोन्ही विहिरींचा परिसर, जुने टाक, राजमाची बाजूकडील बुरूंज, पुरातन महादेव मंदिर परिसराचा विकास यासाठी सूक्ष्म पद्धतीने पाहणी करण्यात आली. त्याचबरोबर हजारमाचीतून गडावर येण्यासाठी असणारा पायरी मार्ग आणि राजमाची, बाबरमाची, डिचोलीकडील बाजू, वनवासमाचीकडील बाजू या गडावर येणाऱ्या असणाऱ्या अन्य चारही बाजूच्या मार्गावर विसावा थांबा करण्यासाठी पाहणी करण्यात आली. विकास आराखडा बनवण्यासाठी शुक्रवारी निखिल कुंभार यांच्यासह त्यांच्या अन्य दोघा सहकाऱ्यांनी गडाची प्रत्यक्ष मोजणी सुरू केली. डॉ. अजित साजणे यांच्यासह माजी पंचायत समिती सदस्य दिपक लिमकर, सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. योगेश कुंभार यांच्यासह सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानचे सदस्य यावेळी उपस्थित होते.

सदाशिवगडावरील तळ्याला पुनरुज्जीवन देण्यासोबत पाझर तलावाच्या निर्मितीसाठी प्रयत्नशील आहे. सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद असेच आहे.

– डॉ. अजित साजणे, वनपरिक्षेत्र अधिकारी, कराड तालुका.

हजारमाची ग्रामपंचायत किल्ले सदाशिवगड विकासासाठी सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानला सर्वतोपरी सहकार्य करण्यास कटिबद्ध असून आम्ही विशेष सहकार्य करू.

– दीपक लिमकर, माजी पंचायत समिती सदस्य, कराड. 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.