सातारा -शिवराज पंपाशेजारील रस्त्यावर अंगावर खडी पडल्याच्या रागातून एकाच्या खूनाचा प्रयत्न करणाऱ्या गणेश अशोक घोरपडे याला सातारा शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने अटक केली. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, शिवराज पंपाजवळ दि. 24 फेब्रुवारी रोजी रस्त्याचे काम सुरू होते. त्यावेळी रस्त्यावरील खडी अंगावर पडल्याने पाच ते सहा जणांनी एकाला लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले होते.
याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर चार संशयितांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र, घोरपडे गेल्या तीन महिन्यांपासून फरारी असल्याने डीबीचे पथक त्याचा शोध घेत होते. दि. 5 रोजी संशयित औद्योगिक वसाहतीजवळील एका हॉटेलजवळ बसायला येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा लावून संशयिताला ताब्यात घेतले. तसेच भीमाबाई आंबेडकरनगर सदरबझार परिसरात दि. 4 जून रोजी झालेल्या मारहाणीतील सराईत गुन्हेगार संजय एकनाथ माने व त्याचा मुलगा रोहित संजय माने (दोघे रा. डी विंग, भीमाबाई आंबेडकरनगर, सदरबझार) यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.