Ajay Baraskar Maharaj: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या भूमिकेवर ठाम आहेत. सगेसोयऱ्याची अंमलबजावणी करा, मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्या, आंतरवालीसह राज्यातील सर्व मराठा आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्या या मागण्या त्यांनी केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अजय महाराज बारस्कर यांनी जरांगे यांच्याविरोधात भूमिका घेत पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता अजय महाराज बारस्कर यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
अजय महाराज बारस्कर आझाद मैदानाजवळील प्रेस क्लब येथे मनोज जरंगे पाटील यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेणार होते. मात्र ती प्रेस रद्द करून ते चर्चगेटजवळील हॉटेल ऑस्ट्रियामध्ये थांबले. यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. चर्चगेट परिसरामध्ये बरासकर हे प्रवास करत असताना काही लोकांनी त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती स्वतःच बारस्कर यांनी दिली आहे.
मनोज जरांगे विरोधात बारस्कर भूमिका मांडत असल्याने पाटील समर्थक मराठा बांधव त्यांचा विरोध करत आहेत. अजय महाराज बारस्कर यांच्यावर पाच ते सहा लोकांनी हल्ला केला होता. ते पत्रकार परिषद घेणार होते, मात्र त्यांच्यावर हल्ला होणार असल्याची पूर्वसूचना मिळाल्याने ती रद्द करण्यात आली. याप्रकरणी कट करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोघांना मरिन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलेआहे. गणेश ढोके पाटील, (वय, 53 राहणार मुरड, लातूर) आणि संदीप एकनाथ तनपुरे, (वय 36 राहणार खेड, पुणे) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावं आहे.
बारस्करांनी जरांगे पाटील यांच्यावर काय आरोप केले ?
दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बारस्करांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले होते. “मनोज जरांगे हा अत्यंत हेकेखोर माणूस आहे. तो कोणत्याही शब्दावर अडून राहत होता. आमचा समाज खूप भोळा आहे. मात्र, मनोज जरांगे हे कायम पलटी मारतात आणि रोज खोटे बोलतात, असा आरोप अजय महाराज बारसकर यांनी केला आहे. मी पैशासाठी किंवा प्रसिद्धीसाठी असे आरोप करत नाही. मी कीर्तनाचे पैसे घेत नाही. मात्र, मनोज जरांगे यांच्या प्रत्येक कृतीचा मी साक्षीदार आहे.”
माझ्या मनात अनेक दिवसापासून खदखद होती. ती आज मी व्यक्त केली. यामुळे मला वारंवार फोन येत आहे, गोळ्या घालून मारून टाकू, अशा धमक्या दिल्या जात आहे. मात्र, मनोज जरांगे यांनी तुकाराम महाराजांचा अपमान केला, ते मी सहन करणार नाही,” असे देखील बारस्कर म्हणाले. दरम्यान, बारस्करांनी हल्ला होणार असल्याची कल्पना आधीच व्यक्त केली होती.