नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सोमवारी घडलेल्या अभूतपूर्व घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. एका वकिलाने भारताचे मुख्य न्यायमूर्ती (CJI) बी. आर. गवई यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यायमूर्ती गवई यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधत घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’वर लिहिले, “भारताचे मुख्य न्यायमूर्ती बी. आर. गवई यांच्याशी संवाद साधला. आज सर्वोच्च न्यायालय परिसरात त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाने देशातील प्रत्येक नागरिक व्यथित झाला आहे. आपल्या समाजात अशा घृणास्पद कृतींना स्थान नाही. न्यायमूर्ती गवई यांनी दाखवलेले संयम आणि शांतचित्त वर्तन प्रशंसनीय आहे. ते न्याय आणि संविधानाच्या मूल्यांप्रती असलेल्या त्यांच्या दृढ निष्ठेचे प्रतीक आहे.” या घटनेचा संबंध काही दिवसांपूर्वी न्यायमूर्ती गवई यांनी केलेल्या भगवान विष्णूविषयीच्या टिप्पणीशी जोडला जात असल्याचे सांगितले जाते. तथापि, न्यायालयात घडलेल्या प्रसंगानंतर न्यायमूर्ती गवई यांनी संपूर्ण संयम दाखवत, “या गोष्टींनी आम्हाला विचलित करता येणार नाही. आपले युक्तिवाद पुढे सुरू ठेवा,” असे न्यायालयातील वकिलांना सांगितले. सोनिया गांधींची तीव्र निंदा – काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. “भारताचे मुख्य न्यायमूर्तींवर झालेला हा हल्ल्याचा प्रयत्न केवळ त्यांच्यावरच नव्हे, तर आपल्या संविधानावर झालेला प्रहार आहे,” असे त्यांनी एका निवेदनात म्हटले. त्या पुढे म्हणाल्या, “न्यायमूर्ती गवई हे अत्यंत साधे, प्रामाणिक आणि दयाळू स्वभावाचे आहेत. त्यांच्या विरोधात झालेल्या या कृत्याचा निषेध करत संपूर्ण राष्ट्राने त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे.” नेमके काय घडले? ही घटना सोमवारी सकाळी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान घडली. 71 वर्षीय एका वकिलाने मुख्य न्यायमूर्ती गवई यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तत्काळ त्याला ताब्यात घेतले. मात्र, न्यायमूर्ती गवई यांनी कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश दिले. या घटनेनंतर सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षांनीही एकमुखाने अशा कृतींचा निषेध करत न्यायालयाच्या स्वाभिमानाचे रक्षण करण्याचे आवाहन केले आहे.