दोन कोटींचा प्लॉट खोटी कागदपत्रे तयार करून हडपण्याचा डाव; बारामती तालुक्यात खळबळ

भवानीनगर – बारामती एमआयडीसीतील समर्थ एंटरप्रायजेसच्या मालमत्तेवर खोटी कागदपत्रे तयार करून सुमारे दोन कोटी रुपयांची मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चंद्रकला सुरेश किनिंगे आणि सुरेश आण्णासो किनिंगे यांच्याविरुद्ध बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात २२ जून २०२५ रोजी गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी भादवि कलम ३१६(२), ३१८(४), ३३८(३), ३४०(१), ३४०(२) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, एमआयडीसी बारामती येथील प्लॉट क्रमांक एफ ३३ वर असलेल्या समर्थ एंटरप्रायजेसमध्ये रजिस्टर भागीदार असलेले उद्योजक अविनाश अर्जुन सावंत (रा. काटेवाडी, ता. बारामती) यांची बोगस लेटरहेड तयार करून त्यांच्या संमतीचे खोटे दस्तऐवज बनवण्यात आले. आरोपींनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतील विद्युत कनेक्शन स्वतःच्या नावे करून घेतले. तसेच, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील संयुक्त खात्याचा गैरवापर करून बारामती येथील एचडीएफसी बँकेच्या गालींदे नगर, भिगवण रोड शाखेत स्वतःला प्रोप्रायटर दाखवून आर्थिक गैरव्यवहार केले. यासाठी बनावट पॅन, जीएसटी क्रमांक आणि रहिवासी पुराव्याचा वापर करण्यात आला.
सदर भागीदारी रजिस्टर असताना आणि ब्रिज ऑफ अग्रीमेंट झाले असतानाही आरोपींनी अविनाश सावंत यांना आर्थिक ताळेबंद देण्यास टाळाटाळ केली. याबाबत कायदेशीर नोटीस देऊनही कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने सावंत यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. तपासाअंती २२ जून रोजी गुन्हा नोंदवण्यात आला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींनी संगनमताने २६ जून रोजी बापू ज्योतिबा सोनवणे (रा. बांदलवाडी, ता. बारामती) यांना पाच महिन्यांसाठी कुलमुखत्यारपत्र दिले, ज्यामध्ये ते व्यवसायासाठी अमेरिकेत जात असल्याचे नमूद केले. मात्र, हे कुलमुखत्यारपत्र बेकायदेशीर असल्याचे सावंत यांच्या लक्षात आले. त्यांनी असा संशय व्यक्त केला की, या कुलमुखत्यारपत्राचा उद्देश ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करून पूर्वीचा गुन्हा दडपण्यासाठी आणि दबाव टाकण्यासाठी होता. यामुळे सावंत यांनी तातडीने हे कुलमुखत्यारपत्र रद्द करण्याची मागणी करत बारामती कोर्टात दाद मागितली. अॅड. सतीश दळवी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून ३१ जुलै रोजी कोर्टाने अंतरीम आदेश जारी केला. याप्रकरणाचा तपास सुरू आहे.
या घटनेमुळे भागीदारी व्यवसाय आणि विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भागीदारांमधील विश्वासाला तडा गेल्याने उद्योजकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.





