West Bengal Elections 2026 – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना खरमरीत पत्र लिहून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मतदार यादी शुद्धीकरण (एसआयआर) प्रक्रियेच्या नावाखाली बंगालमधील खऱ्या मतदारांचा मतदानाचा हक्क हिरावला जाण्याचा धोका निर्माण झाला असल्याचे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे. ममता बॅनर्जी यांनी आपल्या तीन पानी पत्रात असा आरोप केला आहे की, निवडणूक आयोगाकडून घेतले जाणारे निर्णय लोकांचे लोकशाही आणि मूलभूत अधिकार कमकुवत करणारे आहेत. Election Commission Nationwide SIR: एखाद्या घटनात्मक संस्थेकडून ज्या निपक्षपातीपणाच्या दर्जाची अपेक्षा असते, तसा दर्जा सध्याच्या प्रक्रियेत दिसत नाही, अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. या प्रक्रियेमुळे राज्यातील हजारो वैध मतदारांची नावे यादीतून वगळली जाण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. राज्यात २३ आणि २९ एप्रिल रोजी दोन टप्प्यांत मतदान होणार असून ४ मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर, आयोगाने घटनात्मक तत्त्वांचे पालन करून मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित कराव्यात, असे आवाहन बॅनर्जी यांनी पत्राद्वारे केले आहे. निवडणुकांच्या तोंडावर ममता बॅनर्जी यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे बंगालमधील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे.