राष्ट्रवादीचे नगरसेवक डब्बू आसवाणी यांच्या नावाने पैसे मागण्याचा प्रयत्न

पिंपरी – पिंपरी येथे मेट्रोच्या स्टेशनमुळे विस्थापित होणाऱ्या गाळेधारकांना जागा मिळूवन देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक डब्बू आसवाणी यांच्या नावाने पैसे मागितले जात असल्याचा प्रकार समोर येताच थेट आसवाणी यांनी पोलिसांत तक्रार केली. यानंतर झालेल्या चौकशी भाजपाचे नगरसेवक केशव घोळवे यांचे नाव समोर आल्याने त्यांना अटक झाली आहे. भाजकडून लाचखोरी, खंडणीखोरीचे प्रकार सातत्याने सुरू असल्याचे आरोप करत राष्ट्रवादी कॉंग्रेसने केले आहेत.
भाजपाचे नगरसेवक केशव घोळवे यांना अटक झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. या पत्रकार परिषदेला वाघेरे यांच्यासह विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, महिलाध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेवक डब्बू आसवाणी आदी उपस्थित होते.
या प्रकरणाची माहिती देताना आसवाणी म्हणाले, विस्थापित व्यापाऱ्यांना गाळे (जागा) मिळवून देण्यासाठी काहीजण आपले नाव वापरून पैसे मागत होते. याबाबत काही व्यापारी आपल्याकडे आले व गाळा मिळवून देण्यासाठी आपण पैसे मागत आहात का? याची विचारणा केली. कोणीतरी आपल्या नावे पैसे मागत असल्याचे लक्षात आल्यानंतर तात्काळ पोलिसांकडे तक्रार अर्ज केला. या तक्रार अर्जावर पोलिसांनी चौकशी केल्यानंतर भाजपाचे माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक केशव घोळवे व इतर तिघांची नावे आल्याने त्यांना अटक करण्यात आल्याचे आसवाणी म्हणाले.
आसवाणी पुढे म्हणाले, माझ्या नावाने व्यापाऱ्यांकडून पैसे मागितले जाते होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना अडचणीत आणण्यासाठी केशव घोळवे यांनी हा खटाटोप सुरू केला होता. मी तक्रार अर्ज दिल्यानंतर पोलिसांनी गूड्डू यादव या व्यक्तीला अटक केली. त्याने जमा केलेले पैसे केशव घोळवे यांना देत असल्याचे कबूल केले आहे. एका गाळ्यासाठी अडीच लाख रुपये हे लोक वसूल करणार होते. अशा पद्धतीने सुमारे अडीच कोटींचा हा भ्रष्टाचार करणार होते. यामध्ये गोर-गरीब व्यापाऱ्यांना भुर्दंड बसणार होता. त्याचे खापर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माणसावर फुटावे यासाठी भाजपचे केशव घोळवे माझ्या नावाने पैसे मागत असल्याचा आरोप डब्बू आसवाणी यांनी केला.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी भाजपावर यावेळी जोरदार टीका केली. ते म्हणाले, गेल्या सहा महिन्यांमध्ये सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हे दाखल होत आहेत. यावरून भाजपचे नगरसेवक भ्रष्टाचार करण्यात अव्वल असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपच्या नगरसेवकाने दमदाटी करून व्यापाऱ्यांना गाळे मिळवून देण्यासाठी खंडणी मागितल्याचा प्रकार दुर्देवी असून यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेचीही बदनामी होत असल्याचे वाघेरे यांनी सांगितले.





