पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांच्या कार्यालयाच्या दाराला जलपर्णीचे तोरण बांधण्याचा प्रयत्न

पिंपरी – शहरातील नद्यांमधील वाढत्या प्रदुषणाकडे मनपा आयुक्तांचे लक्ष खेचून घेण्यासाठी युवासेनेने थेट आयुक्तांच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला जलपर्णीचे तोरण बांधण्याचा प्रयत्न केला.
मुळा-मुठा नदी पात्रातील वाढत्या जलपर्णीमुळे डासांची संख्या वाढल्याने नदीकाठच्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्ननिर्माण झाला आहे. याकडे महापालिका आयुक्त राजेश पाटील दुर्लक्ष करत असल्याच्या आक्षेप करत युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर जलपर्णीचे तोरण बांधण्याचा प्रयत्न केला. यावेळी पदाधिकाऱ्यांसोबत सुरक्षा रक्षकांची बाचाबाची झाली.
त्यानंतर ठिय्या आंदोलन करत, प्रश्नाकडे डोळेझाक करणाऱ्या महापालिका प्रशासनाचा मंगळवारी (दि.16) अभिनव पद्धतीने निषेध नोंदविला. मुळा-मुठा नदीपात्राला जलपर्णीचा विळखा असून, दोन ते तीन फुटांचा थर तयार झाला आहे. यामुळे दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून डेंगू,मलेरिया यांसारख्या रोगांना निमंत्रण मिळत आहे. त्याची दखल घेत आज आयुक्त राजेश पाटील यांच्या कार्यालयासमोर जलपर्णी तोरण बांधून ठिय्या आंदोलन करण्यात आले.
शहरातील नदीकाठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, दरवर्षी हा त्रास सहन करावा लागत आहे. आयुक्तांना निवेदन देऊन लवकर समस्या न सुटल्यावर आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा इशारा नगरसेवक राजू बनसोडे यांनी दिला आहे. या आंदोलनात पिंपरी युवासेना विभाग संघटक निलेश हाके व मैत्री ग्रुप संस्थापक रवि कांबळे, अक्षय गायकवाड, सचिन नहार, सतीश साळुंखे, आशिष जगताप, अभिजीत जाधव, वैभव गायकवाड, शुभम कांबळे, राहुल बनसोडे सहभागी झाले होते.





