लिव्ह, (युक्रेन) – रशिया आणि युक्रेनच्या प्रतिनिधींमध्ये सोमवारी चर्चेची पुढची फेरी पार पडली. मात्र रशियाच्या फौजांनी युक्रेनमधील किव्ह आणि अन्य शहरांवर तोफांचा मारा सुरूच ठेवला आहे. पोलंडच्या सीमेजवळच्या लष्करी प्रशिक्षण केंद्रावर रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यांमुळे आता हे युद्ध नाटोच्या दारापर्यंत येऊन ठेपले आहे. युक्रेनमधील अनेक शहरांमध्ये रात्रीच्यावेळी हल्ल्याचे इशारे देणारे अलार्म वाजवले जात असतात.
अशातच रशिया-युक्रेनदरम्यानच्या चर्चेतून काही सकारात्मक मार्ग निघण्याची आशा निर्माण झाली. ज्या शहरांना वेढा घातला गेला आहे, तेथील नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर जाऊ दिले जाईल आणि आपत्कालीन अन्नधान्य उपलब्ध करून दिले जाईल, अशी आशाही व्यक्त केली गेली. अद्याप या चर्चेतील निष्कर्ष समजू शकलेला नाही, असे युक्रेनचे अध्यक्ष वोलदिमिर झोलेन्सकी यांनी प्रसारित केलेल्या व्हिडिओ संदेशात म्हटले आहे.
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेली ही चर्चेची चौथी फेरी होती. यापूर्वी बेलारूसमध्ये झालेल्या चर्चेतून काही ठोस निष्कर्ष निघाला नव्हता. मात्र, अलीकडील चर्चेबाबत दोन्ही बाजूंनी आशावाद व्यक्त केला आहे. या चर्चेमध्ये शांतता, युद्धबंदी, तत्काळ सैन्य मागे घेणे आणि सुरक्षिततेची हमी यासारख्या मुद्द्यांवर चर्चा केली जाईल, अशी आशा युक्रेनच्या प्रतिनिधींनी सोमवारी व्यक्त केली होती. आता तांत्रिक कारणासाठी ही चर्चा थांबली असून ही चर्चा पुन्हा सुरू होणार आहे.