बंदी झुगारुन इराणने केली ड्रोन्स शस्त्रसज्ज

तेहरान – सौदी अरेबियाच्या अराम्को या तेलकंपनीवर झालेल्या हल्ल्यापासून ड्रोननिर्मिती आणि त्याद्वारे होणाऱ्या हल्ल्यांचा मुद्दा तापला आहे. येमेनच्या हुथी बंडखोरांनी या ड्रोन हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यांसाठी 10 ड्रोन्सचा वापर झाल्याचे हुथी बंडखोरांनी सांगितले आहे.

 

इस्रायल आघाडीवर

ड्रोन तंत्रज्ञानाच्या विक्रीत इस्रायल इतरांपेक्षा आघाडीवर आहे. ड्रोन विक्रीच्या सुमारे 60 टक्के जागतिक बाजारावर इस्रायलचे वर्चस्व आहे. इस्रायलने टेहळणी करणारे ड्रोन रशियालाही विकले आहेत. इस्रायलच्या सशस्त्र ड्रोन्समध्ये हेरॉन टीपी, हर्मिस 450 आणि हर्मिस 900 चा समावेश आहे.

मागील काही वर्षांमध्ये मध्यपूर्वेतील देशांमध्ये युएव्ही (मानवरहित विमान) हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत. तांत्रिकदृष्टया प्रगत नसूनही मध्यपूर्वेतील देश त्याच्या निर्मितीकरता प्रयत्नशील आहेत. इराणने सशस्त्र ड्रोनची निर्मिती करत यात आघाडी घेतली आहे.ऑक्‍टोबर 2011 मध्ये अफगाण युद्धादरम्यान तालिबानच्या ताफ्यावर हल्ल्यासाठी पहिल्यांदा ड्रोनचा वापर करण्यात आला होता.

लढाऊ ड्रोनचे तंत्रज्ञान प्रारंभी केवळ इस्रायल आणि अमेरिका यासारख्या निवडक देशांकडेच उपलब्ध होते. पण लवकरच चीनही या देशांच्या पंक्तीत सामील झाला. चीन जगभरात स्वतःची शस्त्रास्त्र विकण्याची इच्छा बाळगून आहे. चीनने स्वतःचे लढाऊ ड्रोन मध्यपूर्वेतील देशांना विकले आहेत. इराणने ड्रोनचे अत्याधुनिक तंत्रज्ञान येमेनमधील हुथी बंडखोरांना पुरविण्यात मुख्य भूमिका पार पाडली आहे.

अमेरिकेने आखातात अल-कायदा तसेच इस्लामिक स्टेट विरोधातील स्वतःच्या मोहिमेत सशस्त्र ड्रोनचा वारेमाप वापर केला आहे. प्रिडेटर आणि रीपर यासारख्या ड्रोन्सचा अमेरिकेने सीरिया, इराक, लीबिया आणि येमेनमध्ये वापर केला आहे. प्रिडेटरपेक्षा मोठा आणि अधिक क्षमतेचे एमक्‍यू-9 रीपर अत्यंत मोठी अस्त्र दीर्घ पल्ल्यापर्यंत वाहून नेऊ शकते. ब्रिटनने अमेरिकेकडून अनेक रीपर खरेदी करत त्यांचा वापर इराक आणि सीरियातील लक्ष्यांकरता केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.