Nigeria News – नायजेरियातल्या एका अनाथाश्रमावर सशस्त्र हल्लेखोरांनी हल्ला करून २३ विद्यार्थ्यांचे अपहरण केले आहे. अपहरण केलेल्यांपैकी १५ जणांची सुटका करण्यात आली आहे. मात्र अजूनही ८ जण अपहरणकर्त्यांच्या ताब्यात आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. देशाच्या उत्तर-मध्य भागातल्या कोगी प्रांताची राजधानी असलेल्या लोकोजा शहरात ही घटना घडली. दहाल्लुकिताब ग्रुप ऑफ स्कूल्स या संस्तेच्यावतीने हा अनाथाश्रम बेकायदेशीरपणे चालवला जात होता, असे या प्रांताचे आयुक्त किंग्सले फेमी फानवो यांनी सांगितले. अपहरणकर्त्यांची ओळख पटू शकलेली नाही. आतापर्यंत कोणत्याही गटाने या अपहरणाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. अपहरण करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचे वय काय होते, हे समजू शकले नाही. पण ही मुले बालवाडीतील किंवा प्राथमिक शाळेतील १२ वर्षांच्या आतील असल्याची शक्यता आहे. नायजेरियामध्ये बोको हराम आणि इस्वाप या फुटिर गटाच्या कारवाया होत असतात. शेजारील निगेरच्या सीमेजवळ देशाच्या वायव्येकडील भागात इस्लामिक स्टेटशी संबंधित लुकरावा गट देखील सक्रिय आहे.