Dharashiv News : धाराशिवमधील ‘त्या’ सरपंचावर झालेला हल्ला बनावट; पोलीस तपासात ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

धाराशिव : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरून महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलं आहे. यादरम्यान धाराशिवमधील एका सरपंचावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणाला आता नवे लागले आहे. हा हल्ला बनावट असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
राज्यात बीडचे प्रकरण गाजत असताना धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा गावाचे सरपंच नामदेव निकम यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. कदम यांची गाडी अडवून काही गुडांनी त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. गाडीवर पेट्रोल ओतून गाडी जाळण्याचा प्रयत्न केला, असा दावा निकम यांनी केला होता. मात्र पोलीस तपासात हा हल्ला बनावट असल्याचे समोर आले.
का रचला कट ?
निकम यांनी बंदूक परवाना मिळवण्यासाठी हा कट रचला होता. आपल्या काही साथीदारांना हाताशी धरून त्यांनी स्वत:वर हल्ला झाल्याचा बनाव रचल्याचे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी सांगितले आहे. सरपंचावरील कथित हल्ल्याप्रकरणी चार अज्ञात आरोपींविरोधात तुळजापूर पोलिसात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला होता.
काय म्हणाले पोलीस अधीक्षक संजय जाधव?
मेसाई जवळगाचे सरपंच नामदेव निकम यांनी बंदूक परवाना मिळवण्यासाठी आपल्या काही साथीदारासोबत स्वतःवर हल्ल्याचा बनाव रचला होता. पवनचक्कीच्या वादातून हा हल्ला झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. एवढंच नव्हे तर आरोपींना शिक्षा व्हावी, यासाठी सरपंच निकम यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन देखील केलं होतं. पण हा सगळा त्यांचा बनाव होता हे पोलीस तपासात समोर आले आहे असे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी सांगितले आहे.





