ठाणे : ठाणे जिल्ह्यात दहशतवादाशी संबंधित प्रकरणात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) आज छापे टाकले आहेत. या छापेमारीत सिमीचा माजी अधिकारी साकिब नाचन याच्या निवासस्थानाची तपासणी करण्यात आली. २००२ आणि २००३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणांमध्ये साकिब नाचनला दोषी ठरवण्यात आले होते. राष्ट्रीय तपास यंत्रणेने २०२३ मध्ये इसिसविरुद्धच्या कारवाईदरम्यान नाचनला अटक केली होती. अधिकाऱ्याने सांगितले की, एटीएस पथक बंदी घातलेल्या स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) चा माजी अधिकारी साकिब नाचन याच्या निवासस्थानावरही छापे टाकले आहेत. आम्ही काही व्यक्तींची ओळख पटवली आहे आणि त्यानुसार शोध सुरू आहे. तसेच तिथे (पडघामध्ये) काही चुकीचे आहे का हे शोधण्याचा प्रयत्न करत आहोत, अशी माहिती एटीएसच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी २७ वर्षीय अभियंता रवींद्र वर्माला तीन दिवसांपूर्वी अटक केली होती. तो पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या पीआयओशी संपर्कात होता. आरोपी तरुणाने भारत सरकारने बंदी घातलेली संवेदनशील आणि गोपनीय माहिती पीआयओच्या एजंटसोबत सोशल मीडियाद्वारे शेअर केली होती. रवींद्र वर्माला पोलीस कोठडी पाकिस्तानशी हेरगिरी प्रकरणात ठाण्यातील कळव्याच्या रवींद्र वर्माला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने रवी वर्माला 5 जूनपर्यंत कोठडी सुनावली आहे. रवींद्र मुरलीधर वर्मा याच्याकडून मुंबईतील नेव्हल डाँकच्या ठिकाणची माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांना पाठवल्याचे उघडकीस आले आहे. संवेदनशील ठिकाणचे अनेक नकाशे, आराखडे फेसबुकच्या माध्यमातून गुप्तचर यंत्रणांना पाकिस्तानच्या एजंटला पाठवल्याचा त्याच्यावर आरोप आहे.