आईसोबत भांडून घराबाहेर पडलेल्या तरुणीवर अत्याचार

पुणे – आईबरोबर भांडण झाल्याने घराबाहेर पडलेल्या 19 वर्षीय तरुणीवर घोरपडी रेल्वेस्थानकाजवळ अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी अज्ञात अंदाजे 25 वर्षीय तरुणावर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

रविवार पेठेत राहणाऱ्या 19 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीचे आईबरोबर भांडण झाले. त्यामुळे ती बुधवारी सायंकाळी घरातून बाहेर पडली. पुणे रेल्वेस्थानकात येऊन ही तरुणी बंगळुरुकडे जाणाऱ्या एक्‍स्प्रेसमध्ये बसली. दरम्यान, तिकिट तपासनीस कर्मचाऱ्याने या तरुणीकडे तिकिटाची मागणी केली. तेव्हा तिच्याकडे तिकिट नसल्याने तपासनीसने तिला कराड रेल्वे स्थानकात उतरण्यास सांगितले.

पीडित तरुणी कराड रेल्वे स्थानकात उतरून पुन्हा पुण्यात येण्यासाठी पॅसेंजरमध्ये बसली. बुधवार आणि गुरुवार दोन दिवस काही खाल्ले नसल्याने या तरुणीला चक्‍कर येत होती. त्यातच तिला पॅसेंजरमध्ये एक युवक भेटला. त्याने तिला रिक्षाने घरी सोडतो, असे सांगत घोरपडी स्थानकात उतरण्यास सांगितले. त्या तरुणावर विश्‍वास ठेवून पीडिता घोरपडी स्थानकात उतरली. तेव्हा येथील रेल्वेरूळाजवळ असलेल्या एका छोट्या खोलीत नेऊन या आरोपीने पीडितेवर अत्याचार केला. त्यानंतर तिला घोरपडी रिक्षास्टॅंडवर आणून सोडल्यावर आरोपी पसार झाला. घरातून बाहेर पडल्यानंतर घडलेल्या या सर्व प्रकारानंतर भेदरलेल्या तरुणीने पोलिसांकडे धाव घेत घडलेली हकीगत सांगितली. फौजदार ज्योस्ना पाटील तपास करीत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)