नागपूर : हिवाळी अधिवेशनामध्ये सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याविरुद्ध लक्षवेधी आणण्यावरुन राजकीय वातावरण तापले. यावरून सभागृहात तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडून आपणास बघून घेऊ, अशी धमकी आल्याचे आमदार कृष्णा खोपडे यांनी म्हटले. यावेळी, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंढेंची बाजू घेतली. दरम्यान, आमदार प्रवीण दटके यांनीही सभागृहात तुकाराम मुंढेंविरुद्ध तक्रार केली आहे. खोपडे म्हणाले, तुकाराम मुंढे यांनी चुकीच्या पद्धतीने स्मार्ट सिटी प्रकल्पाचा अतिरिक्त पदभार आपल्याकडे ठेऊन घेतला होता. यासंदर्भात आपण लक्षवेधी दिली असून त्या मध्ये सविस्तरपणे लिहिण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नागपूर अधिवेशनासाठी आलो असता, मला दोन जणांचे धमकीचे फोन आल्याचे त्यांनी म्हटले. 20 ऑक्टोबर रोजी धनंजय भागवत कक्ष अधिकारी यांनी हे पत्र लिहिले आहे. त्यामध्ये नागपूर स्मार्ट सिटी संदर्भातील नियुक्तीवरुन कारवाई करण्याचे पत्र असल्याचे दटके यांनी निदर्शनास आणून दिले. यावेळी बोलताना, विजय वडेट्टीवार यांनी तुकाराम मुंढेंची बाजू घेतली. नागपूर महापालिकेत असताना तुकाराम मुंढेंना आयुक्तांनी क्लीन चीट दिली आहे, हे रेकॉर्डवर आहे. महिला आयोगाकडेही तक्रार झाली होती, पण ज्या महिलेने तक्रार केली त्या महिलेवरच महिला आयोगाने दंड लावला आहे. केंद्रीय महिला आयोगानेही क्लीन चीट दिली आहे. त्यामुळे, तुकाराम मुंढे यांच्यावर जे आरोप झाले आहेत, ते कोणाच्या स्वार्थापायी झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि सत्य परिस्थिती तपासून कारवाई करावी. पण, निर्दोष असतील तर कुठल्याही दबावाखाली ही कारवाई होऊ नये, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.