Walmik Karad : बीडमध्ये वातावरण तापलं : कराडवर मकोका दाखल होताच समर्थक आक्रमक, पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या; परळी बंदीची हाक

बीड – संतोष देशमुख हत्याप्रकरणी अखेर वाल्मिक कराडवर मकोकातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडणी प्ररकरणात अटक करण्यात आलेल्या वाल्मिक कराडवर मकोका (Walmik Karad Mcoca) लावल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी परळी बंदची हाक दिली आहे. परळी शहरात सध्या कडकडीत बंद झाली असून कराडच्या समर्थकांनी रस्त्यांवर टायर पेटवून या गोष्टीचा निषेध केला. वाल्मिक कराडवर पवनचक्की कंपनीकडून दोन कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या मुळाशी हेच खंडणी प्रकरण असल्याचा संशय पोलिसांना आहे.
आज मकरसंक्रांत असल्याने बाजारपेठ गर्दीने सजली होती. मात्र वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर परळी बंदची हाक समर्थकांनी दिली. त्यामध्ये मुख्य बाजारपेठ मोंढा, टावर, बाजार समिती रोड, बस स्टँड रोड सगळं बंद झाले.
रस्त्यांवर शुकशुकाट
वाल्मीक कराडवर मकोका लावल्याची बातमी समजताच कराड समर्थकांकडून परळी शहर बंदची हाक देण्यात आली. 10 मिनिटाच्या आत वाल्मीक कराडच्या समर्थनार्थ परळीतील दुकाने बंद करण्यात आली. शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळत आहेत. दरम्यान, नेमके काय झाले याबाबत माहिती नाही. सर्वांनी दुकाने बंद केल्यामुळे आम्ही पण आमचे दुकान बंद केल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.
वाल्मीक कराडच्या आईचे परळी शहर पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन
वाल्मिक कराडची आई पारुबाई कराड यांनी परळी पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या मांडला आहे. माझ्या लेकाने काही केले नाही. माझ्या लेकाला विनाकारण अडकवत आहेत, तो देवमाणूस आहे, हे सर्व परळीला माहीत आहे, असे त्या म्हणाल्या.
माझ्या लेकाला निर्दोष सोडत नाही, तो पर्यंत पोलिस ठाण्यासमोरून हलणार नाही, असा निर्धार त्यांनी केला. माझ्या लेकाला सोडा, त्याने काही केले नाही, असेही त्यांनी म्हटले. बजरंग सोनवणे, सुरेश धस, संदीप क्षीरसागर यांनी चुकीचे आरोप केलेत. या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. त्यांना अटक करून माझ्या लेकरावरील गुन्हा मागे घ्यावा, अशी मागणीही पारूबाई कराड यांनी केली.
बीडमध्ये जमावबंदीचे आदेश
सरपंच देशमुख हत्या प्रकरणामुळे बीडमध्ये राजकीय वातावरण तापलेले असताना जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहे. बीडमध्ये चारपेक्षा जास्त लोकांना एकत्रित येण्यास पोलिसांनी मज्जाव केला आहे. आंदोलन, मोर्चे यावरही बंदी घालण्यात आली आहे. 28 जानेवारीपर्यंत हा मनाई आदेश असेल, असे बीडचे अप्पर जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी हे आदेश पारित केले आहेत.





