नवी दिल्ली : राजधानी दिल्लीची पाण्याची तहान भागवण्यासाठी दिल्लीतील केजरीवाल सरकारमधील एक मंत्री आतिशी अनिश्चित काळासाठी उपोषणाला बसल्या आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस असून डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीची आज तपासणी केली. त्यांना रूग्णालयात दाखल करण्याची गरज असल्याचे मेडिकल बुलेटीन त्यानंतर डॉक्टरांनी जारी केले असले तरी आतिशी यांनी रूग्णालयात दाखल होण्यास नकार दिला आहे. लोकनायक इस्पितळाच्या डॉक्टरांचे पथक आतिशी यांच्या तपासणीसाठी आले होते. डॉक्टरांनी त्यांना काहीतरी खाण्याची व रूग्णालयात दाखल होण्याची सूचना केली. मात्र आतिशी यांनी त्यास नकार दिला. हरियाणा हे शेजारचे राज्य दिल्लीच्या वाटेचे पाणी सोडत नसल्यामुळे दिल्ली तहनलेली असल्याचा आरोप आतिशी यांनी केला असून त्यासाठीच त्यांनी उपोषण सुरू केले आहे.