आतिशी आज घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ; दिल्लीला मिळणार तिसरी महिला मुख्यमंत्री

Delhi CM Atishi | अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाची राजीनामा देणार असल्याची घोषणा केल्यानंतर राजकारणात अनेक बदल झाले. यानंतर दिल्लाचा पुढचा मुख्यमंत्री कोण असणार? यावरून चर्चा सुरू झाली. यासाठी अनेक नावेही समोर आली. अखेर दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून आतिशी मार्लेना यांची आम आदमी पार्टीने निवड केली.
यानंतर अरविंद केजरीवाल यांनी (17 सप्टेंबर) मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा उपराज्यपालांकडे सुपूर्द केला आहे. त्यानंतर आज शनिवारी 21 सप्टेंबर 2024 रोजी संध्याकाळी आतिशी या दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राज निवास येथे शपथविधी सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे असून आतिशी दुपारी साडेचार ते पाच या वेळेत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
अरविंद केजरीवाल यांनी गेल्या मंगळवारी संध्याकाळी एलजीकडे राजीनामा सादर केला होता आणि आतिशी यांनी सरकार स्थापन करण्याचा दावा केला होता. आतिशी यांच्या मंत्रिमंडळात केजरीवाल सरकारमधील चारही मंत्र्यांना पुन्हा मंत्रिपद दिले जाणार आहे. त्याचवेळी अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या जागेचे प्रतिनिधित्व करणारे मुकेश अहलावत नवा चेहरा असेल. मंत्रिमंडळात अद्याप एक जागा रिक्त आहे. त्याबाबत शपथविधीपूर्वी नाव समोर येण्याची शक्यता आहे.
चार नेत्यांना पुन्हा मिळणार मंत्रीपदासाठी संधी
दिल्लीत गोपाल राय, कैलाश गेहलोत, सौरभ भारद्वाज आणि इम्रान हुसैन हे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. मुकेश अहलावत हे देखील कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. दिल्लीला नवीन कॅबिनेट मंत्री मिळणार आहेत, मुकेश अहलावत हे सुलतानपुरीचे आमदार आहेत.
ते अनुसूचित जाती प्रवर्गातून येतात. ते राजकुमार आनंदची जागा घेतील. दिल्ली सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांसह एकूण सहा मंत्री आहेत. आता मुख्यमंत्र्यांसह पाच मंत्री शपथ घेणार आहेत. आतिशी यांच्या जागी मंत्रिपद अद्याप रिक्त आहे.
केजरीवाल यांची 13 सप्टेंबरला तिहार तुरुंगातून सुटका
अरविंद केजरीवाल यांना ईडीने 21 मार्च रोजी दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात अटक केली होती. यानंतर त्यांना सीबीआयने अटक केली. सीबीआयच्या खटल्यात त्यांना 13 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला होता. ईडीच्या खटल्यात त्यांना आधीच जामीन मिळाला होता. 13 सप्टेंबरलाच ते तिहार तुरुंगातून बाहेर आले.
आतिशी दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री
आतिशी या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. याआधी दिवंगत सुषमा स्वराज आणि शीला दीक्षित दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. याआधी आम आदमी पक्षाच्या (आप) राजकीय घडामोडी समितीच्या (पीएसी) नेत्यांनी दिल्लीचे पुढील मुख्यमंत्री म्हणून आतिशी यांचे नाव सुचवले होते.





