‘आप’च्या पराभवानंतर आतिशी यांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, भाजप लवकरच सरकार स्थापन करणार

Delhi Election Results 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झाला आहे. निवडणुकीतील पराभवानंतर आता दुसऱ्या दिवशी दिल्लीच्या मुख्यमंत्री व आप नेत्या आतिशी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी नायब राज्यपाल व्ही.के. सक्सेना यांची भेट घेत राजीनामा सुपूर्त केला.
आतिशी यांच्या राजीनाम्यानंतर सक्सेना यांनी विधानसभा बरखास्त केली आहे. आतिशी या जवळपास 141 दिवस मुख्यमंत्रीपदावर होत्या. अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आली होती.
आतिशी या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री होत्या. याआधी दिवंगत भाजप नेत्या सुषमा स्वराज आणि काँग्रेसच्या दिवंगत नेत्या शीला दीक्षित या देखील दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या.
दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’चा पराभव करत भाजपाने 27 वर्षानंतर दिल्लीची सत्ता काबीज केली आहे. अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, सौरव भारद्वाज यांसारखे दिग्गज नेते देखील या निवडणुकीत पराभूत झाले. यंदाच्या निवडणुकीत ‘आप’ला 70 पैकी 22 जागा मिळाल्या, तर भाजपचा 48 जागांवर विजय झाला आहे. विजयानंतर भाजपने सरकार स्थापनेची तयारी सुरू केली आहे.
भाजपच्या विजयानंतर आता मुख्यमंत्रीपदी कोणत्या नेत्याची निवड होणार याविषयी चर्चा सुरू झाली आहे. प्रवेश वर्मा, वीरेंद्र सचदेव, विजेंद्र गुप्ता व मनोज तिवारी या नेत्यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहे.





