Arvind Kejriwal : आतिशी यांना खोट्या प्रकरणात अटक होऊ शकते; अरविंद केजरीवाल यांनी केला मोठा दावा

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या निवडणुका पुढील काही महिन्यांत जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, दिल्लीत निवडणुकीच्या आधी मोठ्या राजकीय घडामोडी सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एवढंच नाही तर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असल्यामुळे दिल्लीतील राजकारण तापले आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावर आप सरकारकडून दिल्लीकरांसाठी काही योजनांची घोषणा करण्यात आली आहे.
मात्र, दिल्लीतील आप सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री महिला सन्मान आणि संजीवनी योजनेवरून राजकारण तापले आहे. यातच आपचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गंभीर आरोप केला आहे. अरविंद केजरीवाल म्हणाले, दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना महिलांसाठी मोफत बस प्रवासाशी संबंधित बनावट प्रकरणात अटक केली जाऊ शकते. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारापासून आम आदमी पक्षाचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजपकडून अशा पद्धतीचे राजकारण केले जात असल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला.
केजरीवाल यांनी दावा केला आहे की, ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाची एक बैठक पार पडली आहे. या बैठकीत दिल्लीच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांना अटक करण्यासाठी आणि वरिष्ठ आप नेत्यांवर छापे टाकण्यासाठी त्यांना वरिष्ठांकडून आदेश प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनुसार समोर आली आहे. तसेच दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना मोफत बस प्रवासाशी संबंधित खोट्या प्रकरणात अटक केली जाऊ शकते.
मात्र, मी जिवंत असेपर्यंत महिलांसाठी मोफत बसची योजना थांबवू देणार नाही, असे केजरीवालांनी म्हटले आहे. तसेच माझ्यासह मनीष सिसोदिया, संजय सिंह, सौरभ भारद्वाज, सत्येंद्र जैन आणि आतिशी यांच्यावर छापे टाकले जातील. निवडणुकीच्या तयारी आणि प्रचारापासून आमचे लक्ष विचलित करणे आणि इतर बाबींमध्ये अडकवणे हे भाजपचे लक्ष्य आहे, असेही केजरीवाल म्हणाले.





