पाटणा- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काल (30 मार्च) पाटणा येथील सहकार विभागाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी शहा यांना उद्देशून बोलताना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा एनडीए सोडण्याच्या त्यांच्या आधीच्या निर्णयाबद्दल खेद व्यक्त केला. पूर्वी आपण दोनदा चूक केली, पण आता ती पुन्हा होणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. शहा यांच्या भेटीनंतर नितीश यांनी जी भूमिका मांडली आहे त्यामुळे सगळे काही स्पष्ट झाले असल्याची प्रतिक्रिया या पार्श्वभूमीवर संयुक्त जनता दलाचे नेते के. सी. त्यागी यांनी दिली आहे. संयुक्त जनता दल अर्थात जेडीयू भविष्यातही एनडीएचा म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचाच भाग राहील. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका होतील आणि निवडणुकीनंतर ते मुख्यमंत्री होतील असा दावा त्यागी यांनी केला. दिल्लीतील भाजप खासदार प्रवीण खंडेलवाल यांनीही बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, नितीश कुमार यांनी हे वारंवार सांगितले आहे, यात काही शंका नाही. बिहारमध्ये राजकीय आधार गमावलेले काही लोक आमच्या युतीबद्दल गोंधळ पसरवू इच्छितात. परंतु मी नितीश कुमार यांचे अभिनंदन करतो ज्यांनी हे विधान करून त्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. विरोधी पक्षांकडून कुठेतरी या चर्चांना हवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएचेच सरकार स्थापन होईल हे निश्चित आहे आणि त्यात कोणतीही शंका नाही. नितीश कुमार म्हणाले होते, मी दोनदा चूक केली, पण मी ती पुन्हा कधीही करणार नाही. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी मला मुख्यमंत्री केले हे मी कसे विसरू शकतो? बिहारची पूर्वीची स्थिती काय होती हे सर्वांना माहिती आहे. संध्याकाळी कोणीही घराबाहेर पडत नव्हते. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये भांडणे होत असत. बिहारमध्ये शिक्षणाची स्थिती वाईट होती, उपचारांची व्यवस्था नव्हती. आता केंद्रही बिहारच्या विकासात सहकार्य करत आहे.