Ashish Jaiswal : “कोणाच्यातरी इशाऱ्यावरुन…..”; मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर भाजपच्या बड्या नेत्याचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाले?
Ashish Jaiswal : भाजप नेते आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावरून गंभीर आरोप केले आहेत.

Ashish Jaiswal : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे आज सकाळी ११ वाजता अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. यावेळी ते मोजक्या समर्थकांसह मुंबईकडे कूच करणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे.
मुंबई पोलिसांनी रविवारी जरांगे यांच्या आंदोलनाचा परवानगी अर्ज नाकारला होता. त्यानंतर जरांगे यांच्या वतीने आंदोलनासाठी तिसऱ्यांदा अर्ज दाखल करण्यात आला आहे. या अर्जात ५० जणांना आंदोलन करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी घालून दिलेल्या सर्व नियम आणि अटींचं पालन करू, १८ तारखेला दिलेल्या वेळेतच आंदोलन करू, असंही अर्जात नमूद करण्यात आलं आहे.
आज दुपारपर्यंत आंदोलनाला परवानगी न मिळाल्यास मनोज जरांगे न्यायालयात अर्ज दाखल करण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे नव्याने दाखल केलेल्या अर्जावर मुंबई पोलिस काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आशिष जयस्वालांचा गंभीर आरोप
दरम्यान, भाजप नेते आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावरून गंभीर आरोप केले आहेत. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सरकारने केलेल्या कामाबाबत समाजात चुकीचा संभ्रम निर्माण केला जात असल्याचा दावा त्यांनी केला.
“मराठा समाजाला न्याय दिलेल्या लोकांबद्दल समाजात भ्रम निर्माण करणं योग्य नाही. कोणाच्यातरी इशाऱ्यावरून, द्वेषातून आणि पूर्वग्रहदूषित भावनेतून हे केलं जात आहे,” असा आरोप आशिष जयस्वाल यांनी केला आहे.
ज्यांनी मराठा समाजाला आतापर्यंत विविध योजनांपासून वंचित ठेवलं आणि ज्यांनी समाजाला न्याय देण्याचं काम केलं, त्यांच्याबद्दल जनतेमध्ये चुकीचं आणि खोटं नरेटिव्ह पसरवलं जात असल्याचंही जयस्वाल यांनी म्हटलं आहे. हे वास्तव आता मराठा समाजातील लोकांच्याही लक्षात आलं असल्याचा दावा त्यांनी केला. नागपूरात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आंदोलनावर प्रतिक्रिया दिली.
मुंबई पोलिसांनी परवानगी का नाकारली?
मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाला यापूर्वीही परवानगी नाकारण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या आंदोलनादरम्यान आंदोलनस्थळ आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी झाली होती. त्यामुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. तसेच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
याशिवाय, सध्या मुंबईत गणेशोत्सव सुरू असल्याने शहरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईतील परिस्थिती संवेदनशील असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
आझाद मैदानात आंदोलनासाठी आंदोलकांच्या संख्येवर मर्यादा आहे. मात्र, मनोज जरांगे यांनी मोठ्या संख्येने समर्थक मुंबईत येण्याचं आवाहन केल्याचं पोलिसांच्या भूमिकेतून स्पष्ट करण्यात आलं आहे.
लाखो आंदोलक मुंबईत दाखल झाल्यास दक्षिण मुंबईतील महत्त्वाची रुग्णालये, न्यायालये आणि आर्थिक केंद्रांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. जी.टी. रुग्णालय, कामा रुग्णालय, सेंट जॉर्ज रुग्णालय, बॉम्बे हॉस्पिटल यांसह महत्त्वाच्या ठिकाणी गर्दी आणि वाहतूक विस्कळित होऊ शकते.
Shivsena Hearing: शिवसेना कुणाची? पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी





