पुणे जिल्हा | “त्यावेळी, का जागरुक झाले नाही…?” आमदार बेनकेंचा माजी आमदार सोनवणेंना सवाल

नारायणगाव, (वार्ताहर) – जुन्नर तालुक्याच्या शेतीचा गाभा कुकडीचे पाणी असून 2018 मध्ये कुकडी प्रकल्पाची तिसरी सुप्रमा झाली. त्यावेळी माणिकडोहचे बुडीत बंधारे प्रकल्प वगळण्यात आले. त्यावेळी त्या वेळचे आमदार जागरूक का झाले नाही? असा प्रश्न माजी आमदार शरद सोनवणे यांना आमदार अतुल बेनके यांनी केला आहे.
नारायणगाव (ता. जुन्नर) येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार बेनके बोलत होते. आता चौथी सुप्रमा होणार असून त्यामध्ये अणे पठारचे नाव समाविष्ट करण्यात येणार आहे. आपल्या हातातील हक्काची योजना कोणी ओढून घेऊन जात असेल तर आपण बघ्याची भूमिका घ्यायची का? हा राजकीयवाद नसून जुन्नर तालुका शेतीप्रधान तालुका आहे.
जर आपल्या कुकडीचे पाणी कोणी हिसकावून नेले तर ते परत आणायला नको ? पुढील काळात पाण्यासाठी संघर्ष करावा लागेल पदे येतील जातील, जय पराजय होत राहतील; परंतु तालुक्याचा सेवेकरी म्हणून मी संघर्ष करणार असल्याचे आमदार अतुल बेनके यांनी म्हटले आहे. तालुक्यातील आदिवासी भागातील प्रत्येक गावात कोट्यवधी रुपयांची कामे केली आहे.
त्यासाठी जिल्हा नियोजन, आमदार फंड, नाबार्ड, 25;15, 30;54, 50;54 माध्यमातून रस्त्यांची विविधकामे पूर्ण करीत आहोत. कुकडी प्रकल्पात ज्या केटीवेअर कायद्यात बसत नाही त्या कायद्यात आणण्याचा प्रयत्न 20 ऑगस्ट पर्यंत केला जाईल, असे आमदार बेनके यांनी नमूद केले.
जुन्नरची जनता सुज्ञ
जुन्नरच्या जनतेची प्रदीर्घकाळ सेवा स्व.वल्लभ बेनकेंनी केली. ते दोन टर्म आमदार होते. पहिल्यांदा मला लोकांनी नाकारले तरी मी सेवा केली. आमदार झाल्यानंतरही तालुक्याच्या विकासाची कामे केली. त्यामुळे जुन्नर तालुक्यातील जनता सुज्ञ असून योग्य व्यक्तीला निवडून देतील असा विश्वास असल्याचे बेनके म्हणाले.





