छत्तीसगडमध्ये सकाळी सात वाजता चकमक, एक नक्षलवादी ठार
Updated On:

सुकमा – छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात रविवारी सकाळी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला. चिंतलनार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील थिम्मापुरम गावाजवळील जंगलात सकाळी 6.45 च्या सुमारास ही चकमक झाली.
जिल्हा राखीव पोलिस दल आणि सीआरपीएफचे विशेष पथक (कमांडो बटालियन फॉर रिझोल्युट ऍक्शन) च्या 201 व्या बटालियनचे कर्मचारी, यांच्या संयुक्त कारवाईच्यावेळी ही चकमक झाली. या भागात आणखीही काही नक्षलवादी लपले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
त्यामुळे तेथील शोध मोहीम अजूनही सुरूच आहे. या कारवाईमुळे, राज्याच्या बस्तर भागात गेल्या दोन आठवड्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या पाच वेगवेगळ्या चकमकीत सात नक्षलवादी ठार झाले आहेत, असे पोलिसांनी सांगितले.





