Satara | किमान छ. शिवरायांना तरी भ्रष्टाचारातून सोडा

कराड, (प्रतिनिधी) – मालवण येथील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळ्याची घटना अत्यंत खेदजनक आहे. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पुतळ्याच्या उद्घाटनाची घाई पंतप्रधानांनी केली.
या घटनेवरून भाजपने पुतळा उभारणीतही भ्रष्टाचार केल्याचे उघड असून किमान शिवरायांनातरी भ्रष्टाचारातून सोडा, असे टीकास्त्र माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप सरकारवर डागले. तसेच शिवरायांच्या संबंधित भ्रष्टाचार करणाऱ्यांना जनता कदापीही सोडणार नाही, असे स्पष्ट मतही त्यांनी व्यक्त केले.
येथील शिवतीर्थ दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्याच्या घटनेचा काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी आ. चव्हाण बोलत होते.
ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे. नौदलाचा सल्ला झुकारून नौसेना दिनादिवशी शिवरायांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाची घाई पंतप्रधानांनी केली.
हा पुतळा उभारण्याची तारीख कोणी ठरवली? मूळ टेंडर मध्ये कोणी बदल केला? मूळ पुतळा उभारायला किती वेळ लागणार होता? याठिकाणी भरीव पुतळा उभारण्यात येणार होता? परंतु, ऐनवेळी त्यामध्ये बदल करून त्याठिकाणी पत्र्याचा पुतळा उभारण्यात आला.
केवळ लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पुतळ्याच्या उद्घाटनाची घाई करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, तसेच महाराष्ट्र सरकारचे बांधकाम मंत्री आणि एक जबाबदारी मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची जबाबदारी घ्यायला हवी.
शिवरायांच्या संबंधित भ्रष्टाचार करणाऱ्या भाजप सरकारला जनता कधीही सोडणार नाही, असे बजावत शिवरायांची अस्मिता जपायची असेल, तर कोणीतरी प्रायश्चित्त केले पाहिजे, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले, या घटनेचा सबंध राज्यभर आंदोलन करून निषेध नोंदवण्यात येणार आहे. काही सहकारी मालवण येथे आंदोलन करण्यासाठी गेले आहेत. काही दिवसांत आणखी व्यापक आंदोलन करण्यात येणार आहे. आता तातडीने राज्यभर अशाप्रकारे निषेध नोंदवून आंदोलन करण्यात येत आहे.
शिवरायांची माफी मागून या प्रकरणात दोषी असणाऱ्यांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. आपण कोणते सरकार निवडून दिले, याचा राज्यातील प्रत्येक नागरिकाला पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे ही प्रायश्चित्त करण्याची वेळ आहे.
शिवरायांचा अपमान जनता सहन करणार नाही
शिवरायांचा अपमान जनता कधीही सहन करणार नाही. सध्या शांततापूर्ण मार्गाने आंदोलन सुरू आहे, तोपर्यंत राज्य सरकारने तात्काळ निर्णय घ्यायला हवा. ज्याप्रमाणे बदलापूरची घटना दडपण्याचा प्रयत्न झाला.
तसेच अन्य काही घटनांच्या बाबतीतही तसा प्रयत्न करण्यात आला. मात्र, या प्रकरणात कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न केला, जनता त्याला माफ करणार नाही, असा इशाराही आ. चव्हाण यांनी यावेळी दिला.





