फुरसुंगी ग्रामस्थांचा निर्धार : अधिकाऱ्यांशी चर्चा निष्फळ
फुरसुंगी : महापालिकेच्या फुरसुंगी-उरुळी देवाची कचरा डेपोत ओपन डंपिंगविरोधात ग्रामस्थांनी कालपासून सुरू केलेल्या आंदोलनावर आज दुसऱ्या दिवशीही कोणताच तोडगा निघाला नाही, “आश्वासन नको अंमलबजावणी हवी’ अशी भूमिका घेत कायमस्वरूपी ओपन डंपिंग बंद झाल्याशिवाय माघार न घेण्याचा निर्धार ग्रामस्थांनी घेतल्याने आंदोलनावर लवकर तोडगा काढण्यासाठी आलेल्या पालिका अधिकाऱ्यांना रिकाम्या हातांनीच परतावे लागले आहे.
पुणे महापालिकेच्या फुरसुंगी-ऊरुळी देवाची कचरा डेपोत ओपन डंपिंग करण्यास राष्ट्रीय हरित लवादाने मनाई केलेली असताना याठिकाणी पालिकेकडून ओपन डंपिंग होत असल्याने ग्रामस्थांनी ओपन डंपिंग बंद आंदोलन सुरू केले आहे.यावर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी पालिका प्रशासनाकडून घनकचरा विभाग उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक व अन्य अधिकारी आले होते. मात्र, ग्रामस्थांनी ओपन डंपिंगबाबत माघार न घेण्याची भूमिका घेत नागरी घनकचरा अधिनियम 2000 नुसार कार्यवाही करावी, असे सांगून न्यायालयाचे आदेशानुसार ओपन डंपिंग करू नये अशी भूमिका घेतली त्यामुळे या आंदोलनावर कोणताच तोडगा आजतरी निघाला नाही.उद्या पालिकाआयुक्त व महापौर चर्चेसाठी येणार असल्याचे विशाल हरपळे यांनी सांगितले.
याबाबत बोलताना कचरा डेपो संघर्ष समितीचे अध्यक्ष भगवान भाडळे म्हणाले की गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही समंजसपणाची भूमिका घेत दर आंदोलनाच्यावेळी सहा महिने, नऊ महिने, वर्षभराची मुदतवाढ देऊन कायमच सहकार्य केले आहे. परंतु या कालावधीत पालिका प्रशासन दुसरे आंदोलन उभे राहीपर्यंत कोणतीच कार्यवाही करत नाही. त्यामुळे गेल्या 27 वर्षांपासून कचऱ्याचा प्रश्न कायम भिजत ठेवण्यातच पालिका अधिकाऱ्यांनी धन्यता मानली आहे हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित पालिका अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केल्याशिवाय हा प्रश्न अधिकारी गांभीर्याने हाताळणार नाहीत. त्यामुळे आता काहीही झाले तरी ओपन डंपिंग होऊ देणार नाही. कारण फुरसुंगी-उरुळी देवाची कचरा डेपोत एक किलोसुद्धा कचरा उघड्यावर टाकू नये असे राष्ट्रीय हरित लवादानेच आदेश दिले आहेत.