सोलापूर – शरीर निरोगी राहावं यासाठी आपण व्यायाम करतो. त्यातच पोलीस खात्यातील मंडळी आपल्या फिटनेसच्या बाबतीत अधिक जागरूक असतात. मात्र सोलापूर येथे शहर पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास भोसले यांचं व्यायाम करताना दुर्दैवी निधन झालं. ते ५६ वर्षांचे होते.
सकाळी जिममध्ये व्यायाम करत असताना भोसले यांना अचानक चक्कर आली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सुहास भोसले हे सोलापूर पोलिस आयुक्तालयात डिव्हिजन क्रमांक 1 चे सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.
भोसले यांच्या निधनाची बातमी कळताच सोलापूर पोलिस दलातील अनेक अधिकारी, कर्मचारी रुग्णालयात दाखल झाले. अचानक आपला सहकारी आपल्यातून निघून गेल्याने सोलापूर पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.
जिममध्ये व्यायाम करताना भोसले अचानक ट्रेडमीलवर कोसळले. यावेळी जीम ट्रेनरने तातडीने त्यांच्या छातीला पंपींग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ते शुद्धीवर आले. थोडावेळ आराम केल्यानंतर त्यांनी पुन्हा व्यायामाला सुरुवात केली.
दरम्यान व्यायाम सुरु केल्यानंतर दुसऱ्यांदा त्यांना हृदयविकाराचा झटका आला. जीममध्ये उपस्थित सर्वांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखलं केलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.