Assembly Elections 2024: जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर; 3 टप्प्यात होणार मतदान, तारखा जाहीर

नवी दिल्ली (Assembly Elections 2024) – निवडणूक आयोग आज विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आगामी निवडणुकांची माहिती देत सांगितले की, जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात विधानसभा निवडणुका होतील. पहिल्या टप्प्यातील निवडणूक 18 सप्टेंबरला, दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक 25 सप्टेंबरला, तर तिसऱ्या टप्प्याची निवडणूक 1 ऑक्टोबरला होणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये 4 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या 90 जागा –
कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होणार आहेत. याआधी 2014 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये शेवटच्या विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. मे 2022 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये सीमांकन झाल्यानंतर विधानसभेच्या जागांची संख्या आता 90 झाली आहे. जम्मूमध्ये विधानसभेच्या 43 आणि काश्मीर खोऱ्यात 47 जागा आहेत. यापूर्वी 2014 मध्ये विधानसभेच्या 87 जागांवर निवडणूक झाली होती.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, काश्मीरमधील लोकसभेच्या 3 जागांवर 2019 मध्ये 19.19% मतदान झाले होते, 2024 मध्ये 51.09% झाले. ते म्हणाले की जम्मू आणि काश्मीर विधानसभेत एकूण 90 जागा आहेत ज्यासाठी 87.09 लाख मतदार त्यांचे प्रतिनिधी निवडतील. जम्मू-काश्मीरमध्ये एकूण 11838 मतदान केंद्रे असतील आणि प्रत्येक बूथवर सरासरी 735 मतदार असतील.





