यवतमधील कुटुंबावर प्राणघातक हल्ला; एकाचा मृत्यू, तीन गंभीर जखमी, घटनास्थळी श्वानपथक दाखल

यवत: दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाणे हद्दीत असणाऱ्या यवत रेल्वे स्टेशन परिसरातील निळकंठेश्वर मंदिराजवळ राहणाऱ्या एका कुटुंबावर रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास तीन अज्ञात इसमांनी हल्ला केला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात अविनाश शशिकांत चव्हाण (वय-३४ वर्ष, रा.यवत स्टेशन) याचा मृत्यू झाला असून तीन जनांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हल्ल्याची माहिती मिळताच यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख आणि त्यांचे सहकारी यांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेतली.
याबाबत मिळालेली माहितीनुसार, चड्डी- बनियन घातलेल्या व्यक्तींनी दगड, काठ्यांनी या कुटुंबीयांना बेदम मारहाण केली. यामध्ये घरातील तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. तर या मारहाणीत अविनाश याला रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला आहे. जखमींवर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, संशयिय म्हणून पोलिसांनी दोन नातेवाईकांना ताब्यात घेतले असल्याची माहिती यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली. याबाबत यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. घटनास्थळी यवत पोलिस फिंगरप्रिंट पथक, आणि श्वान पथक दाखल झाले असून पुढील तपास वेगाने सुरु आहे.





