Assam Singer Zubeen Garg Dies: लोकप्रिय गायक झुबीन गर्ग यांचे स्कूबा डायव्हिंगदरम्यान निधन, राज्यात शोककळा

Assam’s Beloved Singer Zubeen Garg Dies: आसामचा लोकप्रिय गायक झुबीन गर्ग यांचे शुक्रवारी सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना अपघाती निधन झाले आहे. वयाच्या 52व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आहे.
झुबीन गर्ग सिंगापूरमध्ये शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या तीन दिवसीय नॉर्थ ईस्ट फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी गेले होते. स्कूबा डायव्हिंगदरम्यान त्यांना श्वास घेण्यास त्रास झाला, त्यानंतर त्यांना तातडीने सीपीआर देण्यात आले आणि सिंगापूर जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, अतिदक्षता विभागात उपचारादरम्यान दुपारी 2:30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा एक्सवर पोस्ट करताना म्हणाले, “आज आसामने आपला लाडका सुपुत्र गमावला. झुबीन यांचे आसामसाठी काय महत्त्व होते, हे शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे. वयाच्या या टप्प्यावर त्यांचे जाणे अकाली आहे. त्यांच्या आवाजात लोकांना ऊर्जा देण्याची अनोखी क्षमता होती आणि त्यांचे संगीत थेट मनाला भिडायचे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. येणाऱ्या पिढ्या त्यांना आसामच्या सांस्कृतिक वारशाचा दिग्गज म्हणून स्मरणात ठेवतील आणि त्यांचे कार्य अनेक नव्या कलाकारांना प्रेरणा देत राहील.”
झुबीन यांचे संगीताव्यतिरिक्त लोकांशी असलेले त्यांचे नाते आणि त्यांना मदत करण्याची तळमळ कायम स्मरणात राहील, असेही सरमा यांनी नमूद केले. “त्यांच्याशी झालेल्या माझ्या सर्व भेटी मी मनापासून जपेन. तो जादुई आवाज कायमचा शांत झाला. ही शोकांतिका शब्दांपलीकडची आहे!” असे ते म्हणाले.
आसाम काँग्रेसचे अध्यक्ष आणि लोकसभेतील पक्षाचे उपनेते गौरव गोगोई यांनीही झुबीन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि त्यांना “प्रत्येक आसामियाचा अभिमान” असे संबोधले. “सिंगापूरमधील अपघातात झुबीन गर्ग यांच्या निधनाची बातमी ऐकून मी अवाक झालो आहे. आम्हाला झालेल्या या हानीचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत,” असे गोगोई यांनी निवेदनात म्हटले.
झुबीन यांचे जन्मस्थळ असलेल्या जोरहाटचे ते लोकसभा खासदार आहेत. “झुबीन यांचे निधन हे संपूर्ण संगीत विश्वासाठी आणि प्रत्येक असमियासाठी वैयक्तिक हानी आहे. मी त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करतो आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो,” असे गोगोई यांनी पुढे नमूद केले.





