Devendra Fadnavis – काँग्रेसच्या काळात आसाम आणि ईशान्य भारताला नेहमीच सावत्र आईसारखी वागणूक मिळाली, ज्यामुळे हा प्रदेश विकासापासून वंचित आणि अशांततेच्या विळख्यात राहिला. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भागाला विकासाच्या केंद्रस्थानी आणून राज्याची अस्मिता खऱ्या अर्थाने जपली आहे,” असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले. जोरहाट येथील भाजप उमेदवार हितेंद्र नाथ गोस्वामी यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या जुन्या धोरणांवर कडक शब्दांत टीका केली. फडणवीस यांनी आरोप केला की, काँग्रेसच्या राजवटीत आसाममध्ये घुसखोरीने टोक गाठले होते. Narendra Modi: घुसखोरीमुळे राज्याची लोकसांख्यिकीय रचना बदलण्याचे गंभीर संकट उभे ठाकले होते. त्याविरुद्ध जनतेला आंदोलने करावी लागली, अनेकांना बलिदान द्यावे लागले. तरीही तत्कालीन सरकारने याकडे दुर्लक्ष केले. मात्र, मोदी सरकार सत्तेत आल्यावर घुसखोरीला पायबंद बसला आणि अनेक अतिरेकी गट मुख्य प्रवाहात सामील झाले, असे त्यांनी नमूद केले. आसामच्या औद्योगिक प्रगतीबद्दल बोलताना फडणवीस यांनी जगिरोड येथील टाटा समूहाच्या सेमीकंडक्टर प्रकल्पाचा विशेष उल्लेख केला. ते म्हणाले, हा प्रकल्प मोदीजींनी आसामला दिलेली अमूल्य भेट आहे. यामुळे आसामचे नाव जागतिक नकाशावर झळकेल. ज्या देशांकडे सेमीकंडक्टर निर्मितीची क्षमता आहे, तेच उद्या जगाचे नेतृत्व करतील आणि भारताने आता त्या मोजक्या देशांत स्थान मिळवले आहे, असे त्यांनी आपल्या भाषणामध्ये नमूद केले. विरोधकांवर निशाणा : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जोरहाटचे उमेदवार गौरव गोगोई यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करताना फडणवीस म्हणाले की, विरोधक इंधन आणि एलपीजीबाबत खोट्या शंका उपस्थित करून लोकांची दिशाभूल करत आहेत. आम्हीही विरोधी पक्षात होतो, पण आम्ही कधीच अशा प्रकारे राष्ट्रविरोधी किंवा लज्जास्पद वर्तन केले नाही, असा टोला देखील त्यांनी लगावला. आसामची संस्कृती, परंपरा आणि इतिहास केवळ भाजपच सुरक्षित ठेवू शकते, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी मतदारांना भाजपला विजयी करण्याचे आवाहन केले.