गुवाहाटी : आसाममधील विधानसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे. त्या राजकीय रणसंग्रामासाठी मोर्चेबांधणी करत असलेल्या सत्ताधारी भाजपच्या तयारीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी घेतला. आसाम दौऱ्यावर असणाऱ्या मोदींनी गुवाहाटीमधील भाजपच्या प्रदेश मुख्यालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी त्या राज्यातील पक्षाच्या नेत्यांशी संवाद साधला. संबंधित बैठकीत राज्याचे मंत्री, खासदार, आमदारांसह सुमारे २८० नेते सहभागी झाले. त्यावेळी व्यासपीठावर जाण्याचे टाळत मोदींनी इतर नेत्यांसमवेत बसणे पसंत केले. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी उचलल्या जाणाऱ्या पाऊलांची मोदींनी माहिती घेतली. तसेच, आगामी निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी कशाप्रकारे तयारी करावी याचे मार्गदर्शनही केले. त्यांनी साधलेल्या संवादाचे स्वरूप अनौपचारिक गप्पांसारखे होते, असे नंतर भाजपच्या नेत्यांनी नमूद केले. आसाममध्ये सलग दोन कार्यकाळ भाजपची सत्ता आहे. त्या राज्यात सलग तिसरा कार्यकाळ मिळवण्याची आकांक्षा तो पक्ष बाळगून आहे. विधानसभा निवडणुकीत विजयाची हॅट्ट्रिक करण्याचा चंग भाजपने बांधला आहे. आसाममध्ये वेळापत्रकानुसार नववर्षाच्या मार्च-एप्रिलमध्ये निवडणूक होईल. त्यासाठी आता अवघे ३ ते ४ महिने उरले आहेत.