गुवाहाटी : केंद्र सरकारनंतर कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेत सुधारणा करण्यासाठी आठवा वेतन आयोग स्थापन करणारे आसाम हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी गुरुवारी केली. राज्याचा आठवा वेतन आयोग माजी अतिरिक्त मुख्य सचिव सुभाष दास यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. केंद्र सरकारने आधीच आठवा वेतन आयोग स्थापन केला असून, त्यानंतर कोणत्याही राज्याने अद्याप असा आयोग स्थापन केलेला नाही. या पार्श्वभूमीवर आसामचा निर्णय ऐतिहासिक असल्याचे सरमा यांनी म्हटले आहे. कर्मचाऱ्यांचे कल्याण आणि प्रगतिशील प्रशासनासाठी हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले. आसाम सरकारने यापूर्वी २०१५ मध्ये वेतन रचना, मानधन आणि सेवा अटींचा अभ्यास करण्यासाठी वेतन आयोग स्थापन केला होता. केंद्रीय आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी १ जानेवारी २०२६ पासून लागू होणार आहेत.