तृतीयपंथीयाचा चतु:शृंगी परिसरात हैदोस
पैसे मागण्याच्या बहाण्याने दोन महिलांची अंगठी, रोकड जबरदस्तीने काढून घेतली
पुणे – शहरात घरफोड्या, महिलांचे दागिने हिसकावणे, वाहनचोऱ्या वाढत असतानाच आता पुणे पोलिसांसमोर तृतीयपंथींना आवरण्याचे नवे आव्हान उभे राहिले आहे. चतु:शृंगी परिसरात मागील काही दिवसांत तृतीयपंथी चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, दोन घटनांमध्ये 50 हजार रुपयांची अंगठी आणि पाच हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
पहिली घटना 10 जानेवारीला रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली. चतु:शृंगी मंदिराच्या प्रवेशद्वारावळ बालेवाडीतील 35 वर्षीय महिला तिच्या पतीची वाट पाहत उभी होती. त्यावेळी एक तृतीयपंथी त्यांच्याजवळ आला आणि त्याने पैशांची मागणी केली. ही महिला पर्समधून पैसे काढून देत असताना त्याने पर्समधील पाच हजार रुपये जबरदस्तीने काढून घेत पळ काढला.
दुसरी घटना 11 जानेवारीला दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉलसमोर घडली. येथे लवळे परिसरातील तरुणी तृतीयपंथीस पैसे देत असताना, त्याने तिच्या हातातील 50 हजार रुपये किंमतीची अंगठी काढून नेली. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास उपनिरीक्षक आर. एस. सरडे करत आहेत.





