कामगारांच्या प्रश्नांसाठी रसायन मंत्र्यांकडे साकडे ! खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय मंत्री मांडवियांसोबत केली चर्चा

पिंपरी – केंद्र सरकारच्या रसायन मंत्रालयांतर्गत रसायनी येथील हिल इंडिया लिमिटेड कंपनीमधील कामगारांचे मागील सहा महिन्यांपासूनचे वेतन थकले आहे. त्यामुळे कामगारांची उपासमार सुरू आहे. तत्काळ कामगारांचे वेतन अदा करावे, अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
केंद्रीय रसायन मंत्री मनसुख मांडवीया यांची खासदार बारणे यांनी कंपनीतील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह भेट घेत ही मागणी केली. या वेळी रावसाहेब पाटील, राजेंद्र पाटील, सतीश म्हसकर, स्वप्नील राऊत, शैलेश बर्वे, ज्ञानेश्वर जांभळे, मयुर पाटील, जयवंत मालसुरे, श्रीपाल यादव उपस्थित होते.
कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन द्यावे, अशी मागणी खा. बारणे यांनी केली. नोव्हेंबर 2022 पासून थकलेल्या आठ महिन्यांचे वेतन द्यावे. 28 महिन्यांचा 62 कोटी रुपये भविष्य निर्वाह निधी द्यावा. 2017 पासून सीओडी लागू करावी. सुरक्षा कर्मचारी नियुक्त करावेत. कंपनी सुरळीत चालण्यासाठी पूर्णवेळ अध्यक्ष नेमावा. मे 2022 नंतर सेवानिवृत्त झालेल्या 60 कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युटी द्यावी. कंपनी व्यवस्थित चालण्यासाठी केंद्र सरकारतर्फे 500 कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य करावे. या बरोबरच कंपनी सुरु ठेवावी. नसेल तर स्वेच्छा निवृत्ती (व्हीआरएस) लागू करावी. कामगारांची थकीत सर्व देणी द्यावीत, अशी मागणी खासदार बारणे यांनी केली.
दरम्यान, याबाबत लवकरच बैठक घेतली जाईल. मार्ग काढला जाईल. कामगारांचे प्रश्न सोडविले जातील. कंपनी चालू ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातील. ते शक्य झाले नाही. तर, स्वेच्छा निवृत्ती (व्हीआरएस) लागू केली जाईल. कामगारांना दिलासा दिला जाईल. त्यांची थकीत सर्व देणी दिली जातील, अशी ग्वाही मंत्री मांडवीया यांनी दिली.





