इस्लामाबाद : पाकिस्तानचे संरक्षण दल प्रमुख (सीडीएफ) झाल्यानंतर फील्ड मार्शल असीम मुनीर दररोज दर्पोक्ती करत भारताच्या विरोधात फुत्कार सोडताना दिसत आहेत. त्यांनी पुन्हा एकदा भारताविरुद्ध प्रक्षोभक विधान केले आहे. यावेळी त्यांनी भारताचे नाव घेतले नसले तरी त्यांनी अप्रत्यक्षपणे भारताच्या विरोधातच आपला मुद्दा मांडला. पाकिस्तानचे सुरक्षा दल बाह्य आणि अंतर्गत धोक्यांना तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत अशी टिप्पणी त्यांनी केली आहे. पाकिस्तान लष्कराने जारी केलेल्या निवेदनानुसार मुनीर यांनी गुजरानवाला आणि सियालकोट छावणी क्षेत्रांना भेट दिली. येथे त्यांना ऑपरेशनल तयारी आणि युद्ध तयारी मजबूत करण्याशी संबंधित प्रमुख उपक्रमांची माहिती देण्यात आली. यावेळी शत्रू, हायब्रिड कारवाया, अतिरेकी विचारसरणी आणि राष्ट्रीय स्थिरता बिघडवू पाहणाऱ्या फुटीर घटकांमुळे निर्माण होणाऱ्या अंतर्गत आणि बाह्य आव्हानांना तोंड देण्यासाठी पाकिस्तानी सैन्य पूर्णपणे तयार असल्याचे ते म्हणाले. पहलगाम येथे एप्रिलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर, भारताने ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू केले होते. यात पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवादी अड्ड्यांना लक्ष्य करण्यात आले. या कारवाईदरम्यान, भारताने पाकिस्तानमधील नऊ प्रमुख दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले, ज्यामध्ये किमान १०० पाकिस्तानी दहशतवादी मारले गेले. १० मे रोजी लष्करी कारवाया थांबवण्यासाठी परस्पर करार झाल्यानंतर हल्ले थांबवण्यात आले. युद्धबंदीपूर्वी, भारताने ११ पाकिस्तानी लष्करी तळ उद्ध्वस्त केले होते. अधिकारी आणि सैनिकांशी संवाद साधताना, मुनीर यांनी त्यांच्या उच्च मनोबलाची आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी अढळ वचनबद्धतेची प्रशंसा केली, त्यांच्या निर्भयतेची आणि मिशन-केंद्रित दृष्टिकोनाची प्रशंसा करतानाच प्रशिक्षणाचे महत्त्वही अधोरेखित केले.