इस्लामाबाद : पाकिस्तानचे लष्कर प्रमुख फिल्ड मार्शल जनरल आसिम मुनीर यांना सौदी अरेबियाच्या किंग अब्दुलाझिझ मेडल ऑफ एक्सलेन्स या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. मुनीर सध्या सौदीअरेबियाच्या दौऱ्यावर असून तेथे त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. सौदी अरेबियातील दोन पवित्र मशिदींचे पालक असलेल्या राजे सलमान बिन अब्दुलअझीझ अल सौद यांनी जारी केलेल्या शाही आदेशानुसार राजे अब्दुलअझीझ यांच्याकडून हा पुरस्कार दिला जातो. सौदी अरेबियाचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान असलेला मेडल ऑफ एक्सलंट क्लास देखील फील्ड मार्शल यांना प्रदान करण्यात आला, असे लष्कराने सोमवारी सांगितले.फिल्ड मार्शल मुनीर यांनी या पुरस्काराबद्दल दोन पवित्र मशिदींचे पालक आणि सौदी अरेबियाच्या नेतृत्वाचे आभार मानले आहेत. हा पुरस्कार म्हणजे पाकिस्तान आणि सौदी अरेबियामधील घनिष्ठ संबंधांचे प्रतिबिंब असल्याची भीवना त्यांनी व्यक्त केली. सौदी अरेबियाची सुरक्षा, स्थिरता आणि समृद्धीसाठी पाकिस्तान कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. मुनीर यांनी सौदीचे युवराज आणि संरक्षण मंत्री खलिद बिन सलमान बिन अब्दुलअझीझ अल सौद यांचीही भेट घेतली. या बैठकीत दोन्ही बाजूंनी प्रादेशिक सुरक्षा गतिशीलता, संरक्षण आणि लष्करी सहकार्य, धोरणात्मक सहकार्य आणि विकसित होत असलेल्या भू-राजकीय आव्हानांसह परस्पर हिताच्या बाबींवर चर्चा केली.