Asim Munir : आसिफ मुनीर यांना निमंत्रण नव्हतेच; व्हाईट हाऊसने दिले स्पष्टीकरण

न्यूयॉर्क : अमेरिकेत शनिवारी झालेल्या लष्करी संचलनासाठी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल आसिफ मुनीर यांना निमंत्रण दिल्याच्या वृत्ताचे व्हाईट हाऊसने खंडन केले आहे. या संचलनासाठी कोणत्याही विदेशी लष्करी नेतृत्वाला निमंत्रण देण्यात आलेले नव्हते. जनरल आसिफ मुनीर यांना निमंत्रण दिल्याचे वृत्त पुर्णपणे खोटे आहे, असे व्हाईट हाऊसच्या पदधिकाऱ्याने म्हटले आहे.
ब्रिटीश वसाहतवादी राज्याशी सामना करण्यासाठी अमेरिकेच्या लष्कराची स्थापना १४ जून १७७५ रोजी झाली होती. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वाढदिवसाच्याच दिवशी आणि लष्कर स्थापनेला २५० वर्षे पुर्ण होत असल्याच्या निमित्ताने या भव्य लष्करी संचलनाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने जगासमोर आपल्या सामर्थ्याचे प्रदर्शन करण्यासाठी ट्रम्प यांनी या संचलनाचे आयोजन केले होते. मात्र या संचलनाला पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल आसिफ मुनीर यांना निमंत्रित करण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यामुळे भारतात तीव्र प्रतिक्रिया उमटली होती.
अलिकडेच भारत आणि पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर झालेल्या लष्करी संघर्षाच्या पार्श्वभुमीवर जनरल मुनीर यांना अमेरिकेचे निमंत्रण मिळाल्याची बातमी आल्यामुळे भारतातील कॉंग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी सरकारवर टीका करायला सुरुवात केली होती. मात्र व्हाईट हाऊसने स्पष्टिकरण दिल्यामुळे प्रसिद्ध झालेले वृत्तच खोटे असल्याचे स्पष्ट झाले. पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला अमेरिकेत उपमंत्र्यांपेक्षा वरच्या श्रेणीच्या अधिकाऱ्यांची भेट मिळू शकली नव्हती. त्यामुळे पाकिस्तानकडून जाणीवपूर्वक हे खोटे वृत्त पसरवण्यात आले होते, हे स्पष्ट झाले आहे.





