#AsiaCup2023 #INDvNEP : पावसामुळे पुन्हा खेळ थांबला; TeamIndia च्या बिनबाद 17 धावा…

Nepal vs India Asia Cup 2023 : पावसामुळे पुन्हा एकदा खेळ थांबवावा लागला आहे. खेळ थांंबला तेव्हा भारताच्या 2.1 षटकात एकही विकेट न गमावता 17 धावा झालेल्या होत्या. कर्णधार रोहित शर्मा 4 धावा करून तर शुभमन गिल 12 धावा करून क्रीजवर आहे.
तत्पूर्वी, टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आसिफ शेख आणि सोमपाल कामी यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर नेपाळने भारतासमोर 231 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या नवशिक्या संघाला ऑलआऊट करण्यासाठी भारताला 48.2 षटके लागली. नेपाळच्या संघाने भारतीय गोलंदाजांना घाम फोडला आणि 230 धावा केल्या.
नेपाळकडून आसिफने शानदार फलंदाजी केली आणि 97 चेंडूंत आठ चौकारांच्या मदतीने 58 धावांची खेळी केली. तर सोमपाल कामीने 56 चेंडूत 48 धावा केल्या. या खेळीत त्याने एक चौकार आणि दोन षटकार मारले. कुशाल भुर्तेल याने 25 चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 38 धावा केल्या. दीपेंद्र सिंह एयरी याने 25 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने 29 धावांची खेळी केली.
नेपाळसारख्या संघाला बाद करण्यासाठी भारतीय गोलंदाज धडपडताना दिसले. भारतीय गोलंदाजांची ही कामगिरी पाहता विश्वचषकात टीम इंडियाच्या विजयाच्या शक्यतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण खूपच निराशाजनक होते. पहिल्या काही षटकांमध्ये श्रेयस अय्यर, विराट कोहली आणि इशान किशन यांनी तीन सोपे झेल सोडले.
भारताकडून गोलंदाजीत सिराज आणि जडेजाने प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या तर शमी, हार्दिक आणि शार्दुलला प्रत्येकी एक विकेट मिळाली. सिराजने तीन विकेट घेतल्या, पण त्याने 9.2 षटकात 61 धावा दिल्या. शार्दुलने चार षटकांत 26 धावा दिल्या.





