#AsiaCup2023 #INDvNEP : नेपाळला कमी लेखणे चूक ठरेल; भारताचा आज साखळीतील दुसरा सामना…

पाल्लेकेले :- पाकिस्तानविरुद्धचा सामना पावसाने वाया गेल्यामुळे दीग्गज फलंदाजांचा ताफा असला तरीही भारतीय संघाला नेपाळ संघाला कमी लेखून चालणार नाही. या दोन संघात आशिया करंडक स्पर्धेचा साखळीतील अखेरचा सामना आज येथे रंगणार आहे. सुपर फोर गटात स्थान मिळवण्यासाठी या लढतीत विजय मिळवणे भारतीय संघासाठी अनिवार्य बनले आहे.
भारत विरुद्ध नेपाळ
वेळ – दुपारी 3 वाजल्यापासून
ठीकाण – पाल्लेकेले, श्रीलंका
थेट प्रक्षेपण – स्टार स्पोर्टस
भारत व पाकिस्तान यांच्यातील लढत पावसामुळे रद्द झाली. भारतीय संघाने 266 धावा केल्या होत्या. मात्र, त्यानंतर पावसामुळे पाकिस्तानचा डाव सुरु होऊ शकला नाही. मात्र, त्यांनी नेपाळविरुद्ध विजय मिळवला असल्याने भारताविरुद्धच्या सामन्यातील गुणांसह त्यांनी सुपर फोर गटात प्रवेश केला आहे.
नेपाळने पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत पराभव पत्करला असला तरीही त्यांनी गोलंदाजीत दाखवलेली चमक पाहता भारताच्या नवोदित फलंदाजांना जास्त सावध फलंदाजी करावी लागणार आहे. त्यातच संघातील प्रमुख फलंदाज नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल, इशान किशन, सूर्यकुमार यादव या फलंदाजांकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. या स्पर्धेत त्यांना आगामी काळात होत असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेची तयारी करता येणार आहे.
भारताचा संघ फलंदाजी, गोलंदाजीत कागदावर सरस दिसत असला तरीही त्यांच्याकडे सातत्याचा अभावही दिसून आला आहे. विशेषतः आयसीसी किंवा एसीसीच्या स्पर्धांमध्ये गेल्या दोन ते तीन वर्षांत भारतीय संघाने फारशी प्रभावी कामगिरी केलेली नाही. आयसीसीच्या स्पर्धांमध्ये तर गेल्या दहा वर्षांत भारताला एकाही स्पर्धेचे विजेतेपद मिळवता आलेले नाही. त्यामुळे यंदाची आशिया करंडक स्पर्धा भारताने जिंकली तर त्यांना मायदेशात येत्या ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये होत असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी अत्यवश्यक असलेला आत्मविश्वास मिळेल.
नेपाळच्या संघाबाबत बोलायचे तर त्यांच्याकडे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव नसला तरीही त्यांनी आयसीसीच्या पात्रता स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्याच जोरावर ते यंदा पहिल्यांदाच आशिया करंडक स्पर्धेसाठी पात्र ठरलेले आहेत. म्हणजेच त्यांच्याकडे गुणवत्ता आहे मात्र, अनुभवाची कमतरता आहे. हाच अनुभव त्यांना या स्पर्धेद्वारे मिळणार आहे.
सोमपाल कामी, करण के. सी. तसेच संदीप लामिछने यांनी गोलंदाजीत सातत्यपूर्ण कामगिरी करत आयसीसीच्या अनेक स्पर्धांमध्ये आपली कामगिरी व दर्जा सिद्ध केला आहे. फलंदाजीत त्यांच्याकडे आरीफ शेख, सोमपाल कामी यांच्यासह गुलशन झा, आसीफ शेख असे चांगले फलंदाज आहेत. अर्थात हे फलंदाज भारताच्या जसप्रीत बुमराह, महंमद शमी व महंमद सिराज यांचा सामना कसा करतात यावरच त्यांचा विजय व पराभव अवलंबून आहे.
त्यांचा कर्णधार रोहित पुडेल यानेही प्रथम दर्जाच्या सामन्यांमध्ये सरस व सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्याच्याकडून नेपाळ संघाला मोठ्या अपेक्षा आहेत. या स्पर्धेनंतर सहयोगी देशांच्या संगांमध्ये आयसीसीच्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेच्या पात्रता लढतींना प्रारंभ होणार असून त्यातही पात्र होण्याची नेपाळला संधी आहे.
कुलदीप निर्णायक ठरेल
भारतीय संघाचा चायनामन फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने यंदाच्या मोसमात अत्यंत सरस कामगिरी केली आहे. त्याने वेस्ट इंडिज व आयर्लंड यांच्याविरुद्धच्या मालिकांमध्ये आपल्या कामगिरीच्या जोरावर संघाच्या विजयात मोलाची भूमीका बजावली आहे. त्यामुळे नेपाळविरुद्धच्या लढतीत डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजापेक्षाही कुलदीप सरस ठरु शकतो, त्यामुळे त्याला संधी मिळणार का याची उत्सूकता निर्माण झाली आहे.





