Ravichandran Ashwin | ‘आयसीसी’च्या पुरस्कारावर अश्विनचाच दावा

नवी दिल्ली – भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन, इंग्लंडचा कर्णधार जो रूट आणि वेस्ट इंडिजचा उदयोन्मुख फलंदाज कायले मेयर्स यांना आयसीसीने यंदाच्या फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू पुरस्कारासाठी नामांकन दिले आहे.
तीन खेळाडूंमधून जरी एकाच खेळाडूला हा पुरस्कार दिला जाणार असला तरीही त्यावर भारताच्या अश्विनच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वाढली आहे. यंदाच्या वर्षापासून आयसीसीने हा नवा पुरस्कार देण्यास सुरुवात केली.
त्यातील पहिल्याच पुरस्काराचा मानकरी भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत यालाच मिळाला होता. आता फेब्रुवारी महिन्याचा मानकरी कोण ठरणार हे आयसीसीकडून लवकरच जाहीर केले जाणार आहे.
फेब्रुवारीत इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटींमध्ये अश्विनने एका शतकासह 176 धावा करतानाच 24 बळी मिळवले आहेत. इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूटने एका द्विशतकासह 333 धावा करताना 6 बळी मिळवले आहेत. तर कारकिर्दीतील पहिल्याच सामन्यात द्विशतक झळकावून वेस्ट इंडीजला 395 धावांचे लक्ष्य गाठून देणारा मेयर्ससुद्धा या पुरस्कारासाठी शर्यतीत आहे.





